
सिंधुदुर्ग : 'जावे त्याच्या वंशा' हे पुस्तक वाचकांना समृद्ध करणारं आहे. लेखक, ज्येष्ठ पत्रकार संजय ढवळीकर यांचे आत्मचरित्रच या पुस्तकातून उलगडत असून वर्तमानपत्रांच अंतरंग यातून दिसत. वर्तमानपत्राची दृष्टी कशी असावी ? यावरच भाष्य त्यांनी या पुस्तकातून केल आहे. त्यामुळे या पुस्तक वाचनातून वाचनाची श्रीमंती मिळेल. तसेच 'माणुसकीचा झरा' हे पुस्तक जगण्यास शिकवते. सृजनशील साहित्यिक, लेखकाच दर्शन श्री. ढवळीकर यांच्या रूपानं घडून येतं, अर्थपूर्ण आयुष्य कसं जगायचं हे पुस्तक शिकवून जात, असे मत गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत यांनी व्यक्त केले. गोवा येथील लेखक, माजी गोवा राज्य माहिती आयुक्त संजय ढवळीकर लिखीत 'माणुसकीचा झरा, व 'जावे त्याच्या वंशा' तसेच लेखिका सौ. उज्वला ढवळीकर यांच्या 'मनतरंग' पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि माजी गोवा राज्य माहिती आयुक्त संजय ना. ढवळीकर यांच्या 'माणुसकीचा झरा' आणि 'जावे त्याच्या वंशा' या दोन पुस्तकांचे प्रकाशन तसेच लेखिका सौ. उज्वला सं. ढवळीकर यांच्या 'मनतरंग' या पुस्तकाचे प्रकाशन पणजीतील हॉटेल डेल्मॉनच्या सभागृहात गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत, गोवा विद्यापीठातील मराठीचे प्राध्यापक डॉ. विनय बापट यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. पुस्तक प्रकाशनानंतर नितीन कोलवेकर आणि सौ. श्रुती हजारे यांनी अभिवाचन सादर केलं. दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत ढवळीकर कुटुंबाकडून करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष श्री. सामंत म्हणाले, आपण संवेदनाहीन कसे झालोत ? याच चित्रमय प्रसंगातून वर्णन लेखक श्री. ढवळीकर यांनी केलं आहे. ही परिस्थिती कशी बदलली पाहिजे हे देखील त्यांनी सांगितलं. पुस्तकातील लेख हे वास्तव घटनांवर आधारित असून चांगली पत्रकारिता कशी असावी ? सध्याच्या पत्रकारितेत काय चुकतं ? संपादकांनी कसं लिखाण कराव ? यावर लेखन केलं आहे. तसेच चांगला संपादक लोकांना कशी जाग आणू शकतो ? भ्रष्टतेवर कसा प्रहार करू शकतो यासह वर्तमानपत्राची दृष्टी कशी असावी यावर त्यांनी भाष्य केल आहे. तर, 'माणुसकीचा झरा' हे पुस्तक जगण्यास शिकवते. यातून सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी समाजाला दिला आहे. व्यक्तीचित्रांच वर्णन यात केलं असून अर्थपूर्ण आयुष्य कसं जगायचं हे शिकवलं आहे. तसेच लेखिका सौ उज्वला ढवळीकर यांच्या 'मनतरंग' पुस्तकाचंही श्री. सामंत यांनी कौतुक केलं.
प्रकाशन सोहळ्यास उपस्थित प्रमुख पाहुणे गोवा विद्यापीठाचे प्रा. डॉ. विनय बापट यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, मनतरंग पुस्तकातून सौ. उज्वला ढवळीकर यांनी मानवी भावभावनांच दर्शन घडवून आणलं आहे. त्यांच्या लेखनातील व्यापकता पुस्तकाचं समीक्षण करताना दिसून येते. विचारांची बैठक त्यांच्या लेखनात असून पुस्तक वाचताना त्यातील प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात. संवादात्मक शैली लेखनात भावते असं मत व्यक्त करत लेखक संजय ढवळीकर यांच्या 'माणुसकीचा झरा' व 'जावे त्याच्या वंशा' पुस्तकांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात लेखिका सौ. उज्वला ढवळीकर म्हणाल्या, संजय ढवळीकर यांच्यासह माझंही पुस्तक प्रकाशित होतंय याचा आनंद होत आहे. माझ्या डायरीतील गोष्टी पुस्तकबद्ध झाल्या असून त्या आता वाचकांच्या होणार आहेत. तर लेखक, ज्येष्ठ पत्रकार संजय ढवळीकर म्हणाले, पत्रकाराच काम लिहीयाच असतं. मात्र, फक्त बातम्या लिहाव्यात का ? त्यामुळे आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींच्या मनावर झालेल्या नोंदी कागदावर उतरवत गेलो. आज त्यांचे पुस्तक निर्माण झाले. 'माणुसकीचा झरा' हे व्यक्तीचित्रण करणार पुस्तक असून 'जावे त्याच्या वंशा' या पुस्तकातून जीवनात आलेल्या चांगल्या, वाईट अशा विविध प्रसंगावर लिखाण केलय. माझ्या या पुस्तकातून नवोदितांना लिखाणाची प्रेरणा मिळावी हाच उद्देश आहे अस मत व्यक्त केले.
यावेळी पुस्तकासाठी मेहनत घेणाऱ्या हातांचा तसेच उपस्थित मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी गोवा विद्यापीठ मराठी अध्ययनशाखा प्राध्यापक डॉ. विनय बापट, कार्यक्रमाचे अध्यक्ष गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत, अभिवाचक नितीन कोलवेकर, श्रृती हजारे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य ॲड. नकुल पार्सेकर, उर्मीला वाघ, शलाका ढवळीकर, निहार ढवळीकर आदींसह गोवा, महाराष्ट्रातील साहित्य रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मानसी वाळवे यांनी तर आभार उमेश ढवळीकर यांनी मानले.










