
सावंतवाडी : आजकाल समाजमाध्यमांवर क्रिया-प्रतिक्रियांचे उद्योग सुरू आहेत. समाजात संशयाची बिजे पेरली जात आहेत. अशावेळी देश घडविणारे, प्रश्न विचारणारे, संस्कृतिचे डबकं करू पाहणऱ्याना जागे करणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे. भूक, पीडा, सामाजिकतेविषयी बोलतं करणारं, ‘नाही रे वर्गाचे प्रतिनिधीत्व करणारे साहित्य यायला हवे, असे प्रतिपादन पहिल्या सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा कवयित्री नीरजा यांनी येथे केले.महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अनुदानित आणि श्रीराम वाचन मंदिर,सावंतवाडी आयोजित पहिले सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या कविवर्य केशवसुत साहित्य नगरीत आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर माजी शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर, स्वागताध्यक्ष प्रा. प्रवीण बांदेकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे सावंत-भोसले, अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी, कोल्हापूरचे सहाय्यक शिक्षण उपसंचालक डॉ. गणपती कमळकर, श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष ऍड. संदीप निंबाळकर, सचिव रमेश बोंद्रे, सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडलाचे अध्यक्ष विक्रांत सावंत, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य शेखर सामंत, भरत गावडे, विठ्ठल कदम, विश्वकोष मंडळाच्या सदस्या डॉ. शरयू आसोलकर, म. ल. देसाई आदी उपस्थित होते.
प्रारंभी आरपीडी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी महाराष्ट्र गीत व स्वागतगीत सादर केले. तर दादा मडकईकर यांनी ‘अशा लाल मातीत जन्मास यावे...’ ही कविता सादर केली. प्रास्ताविक ऍड. संदीप निंबाळकर यांनी केले. तर साहित्य संस्कृती मंडळी भूमिका भरत गावडे यांनी मांडली. संमेलनाध्यक्षा नीरजा म्हणाल्या की, लेखकाला आपल्या लेखनातून काळ उभा करावा लागतो. आज पुरोगामीत्व धोक्यात आलंय. राजकारण रसातळाला गेलंय. भाषा बिभत्स झालीय. अशावेळी लेखक, साहित्यिकांची जबाबदारी वाढली आहे. मात्र, कोणत्याही राजकारण्याला असे साहित्य नको असते. संस्कृतीला कर्मकांडात न ठेवते ते साहित्य. साहित्य म्हणजे केवळ आक्रोश नव्हे. साहित्य म्हणजे आत्मशोधाचा प्रवास असतो. कला आणि जीवन या गोष्टीही महत्वाच्या असतात.
लेखकाने वैचारिक मांडणी पूर्ण केली पाहिजे. एखादी भूमिका पटत नसेल तर तशी मांडणी केली पाहिजे. आजच्या काळातील मुली थेटपणे लिहित आहेत. आत्मशोध घेताहेत, हे कौतुकास्पद आहे. स्त्रीवाद म्हणजे केवळ स्त्री मुक्ती नव्हे, तर ती एकप्रकारे पुरुषांचीही मुक्ती असते, असेही त्या म्हणाल्या.
तपोवनातील वृक्षतोडीचा निषेध
आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा निषेध केला. त्या म्हणाल्या की, सरकारे निषेध व्यक्त करण्यची संधी देतात. बोलणारे, कलावंत, साहित्यिक, पत्रकार कोणत्याही पक्षात नसतात. त्यांनी व्यक्त झाले पाहिजे. ज्या काळात आयआयटीमधून वैदिक, मंत्रसंस्कारांचे अभ्यासक्रम सुरू केले जातात, तेव्हाही अशा कत्तली होतात. ही कत्तल वैचारिक असते. अशावेळी अशी संमेलने महत्वाची ठरतात. साहित्यातून दिला जाणारा विचार महत्वाचा असतो. ज्ञानेश्वर, तुकाराम, जनाबाई यांनी निर्मिलेले साहित्य हे कालातीत आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळाला आहे. आज मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत आहेत. त्या टिकल्या पाहिजेत. त्रिभाषा सूत्र आम्हाला नको आहे. साने गुरुजींनी आंतरभारती संकल्पना मांडली. सर्व भाषा जोडल्या पाहिजेत, अशी त्यांची भूमिका होती. इथले लेखन इतर प्रदेशात कळत नाही. यासाठी अनुवाद अकादमीची गरज आहे. असे झाले तर मराठीतील साहित्य जगाला समजेल. लेखकांमध्ये अस्वस्थता
ज्ञानेश्वर, तुकारामांप्रमाणे केशवसुत आजही समरणात आहेत. त्यांनी बंडखोर कविता लिहिली. सावंतवाडीशी त्यांचे नातं आहे. आजही अशी कविता लिहिली जात आहे. आज कवी, लेखकांमध्ये अस्वस्थता, जगण्याचे भय वाटावे, अशी स्थिती आहे. तरीही ते बोलू पाहतात, हे महत्वाचे आहे, असेही नीरजा यांनी नमूद केले.
स्त्रियांनी पारंपरिक बंधनातून, व्रतवैकल्यातून बाहेर पडण्याची गरज आहे. त्यांनी आपला आतला आवाज मांडला पाहिजे. तरा त्यांची उन्नती होणार आहे. धार्मिक व्रतवैकल्यातून त्यांना विचार करण्यापासून रोखले जात असल्याचे खंतही नीरजा यांनी व्यक्त केली. प्रमुख अतिथी तथा माजी शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी साहित्यिक जीवन समृद्ध करतात. नवा दृष्टिकोन देतात, असे सांगून पूर्वी अ. भा. साहित्य संमेलनासाठी 50 लाख रुपये दिले जात. आता 2 कोटी रुपये दिले जातात. विश्व मराठी साहित्य संमेलन घेतले जाते. आपली मायबोली मराठी मंडळ स्थापनेसाठी सरकार अनुदान देते. भाषा बोली गेली पाहिजे, हा यामागा उद्देश असल्याचे सांगितले. मराठी भाषेचे भव्य केंद्र मुंबई मरीन लाईन्स येथे 200 कोटी रुपये खर्चून होत आहे, असे त्यांनी नमूद केले.
नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी मराठी संस्कृती पुढे नेण्यासाठी, कला व संस्कृती पुढे नेण्यासाठी आपण योगदान देऊ, अशी ग्वाही दिली. स्वागताध्यक्ष प्रा. प्रवीण बांदेकर यांनी कोकणातील साहित्यिक परंपरा आढावा घेतला. साहित्य संमेलनानिमित्त आयोजित आ. सो. शेवरे ग्रंथदालन उद्घाटन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. तर व्यासपीठाला माजी आमदार जयानंद मठकर यांचे नाव देण्यात आले होते. संमेलनानिमित्त आयोजित विविध स्पर्धोंचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले. संमेलनानिमित्त विठ्ठल गावकर-दशावतार, सुरेश रणसिंग-कठसुत्री बाहुल्या, गणपत परब-लोकगीते, विजयालक्ष्मी भोसले-शिक्षण, डॉ. अशोक सुर्वे-वैद्यकीय, संजीवनी देसाई-पत्रकारिता, प्रभाकर भागवत-साहित्य, आनंद देवळी-ग्रंथालय, अनिल हळदिवे-क्रीडा, महादेव परब-उद्योग, सुरेश ठाकुर-कथामाला, उदय पंडित- सांस्कृतिक या ज्येष्ठां सत्कार करण्यात आला. तर युवा प्रेरणा पुरस्काराने रवी जाधव-समाजकार्य, प्रमोद दळवी-शेती, अक्षय सावंत-कला, पूजा सावंत-उद्योग, मेगल डिसोजा-पर्यावरण यांचा गौरव करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानधन, स्मृतिचिन्ह आणि पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ लेखिका उषा परब यांच्या पुस्तकाचे प्रकाशन तसेच वैनतेय वार्षिक अंकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. अरुण पणदूरकर यांनी केले. तर पुरस्कार वाचन विजय ठाकर यांनी केले.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत डॉ. जी. ए. बुवा, राजेश मोंडकर, रमेश बोंद्रे, ऍड. संदीप निंबाळकर, बाळ बोर्डेकर यांनी केले. यावेळी संमेलन आयोजन समितिच्या डॉ. सुमेधा नाईक, सखी पवार, शालिनी मोहळ, स्मिता खानोलकर, श्वेतल परब, मनोहर परब, किशोर वालावलकर, विनया बाड आदी उपस्थित होते. आभार रमेश बोंद्रे यांनी मानले.










