
सावंतवाडी : ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्यांचा आदर करणे आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करून त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन सावंतवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी काढले. ते नेमळे ग्रामपंचायत येथे आयोजित ‘ज्येष्ठांची गावभेट ग्राम संवाद’ या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात सात कलमी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत स्वच्छता, कार्यालयीन स्वच्छता, गावभेट ग्राम संवाद यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. नेमळे येथे झालेल्या या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक ओतारी यांनी गावातील ज्येष्ठांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक ओतारी यांनी सांगितले की, गावामध्ये जर एखादा विकास प्रकल्प चालू असेल आणि त्या प्रकल्पाला कोणी समाजकंटक त्रास देत असेल, तर त्यांना पोलीस संरक्षण पुरवले जाईल आणि त्यांच्या कामाला प्रोत्साहन दिले जाईल. सिंधुदुर्ग जिल्ह्याला अमली पदार्थ मुक्त करण्याचा निर्धार पोलिसांनी केला असून, सिंधुदुर्ग एक पर्यटन जिल्हा असल्याने या दृष्टीनेही आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी एक स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली असून, त्यावर ते आपल्या तक्रारी नोंदवू शकतात. कुटुंबातील सदस्यांकडून होणारा त्रास, बँकेतील किंवा कार्यालयातील अडचणी, दामदुप्पट पैशाचे आमिष दाखवून होणारी फसवणूक, केवायसी किंवा वीज बिल भरण्याच्या नावाखाली येणारे फसवे फोन यांसारख्या कोणत्याही समस्येबाबत ज्येष्ठ नागरिक या वेबसाईटवर तक्रार करू शकतात. अशा फसव्या कॉलस् वर विश्वास ठेवू नये आणि कोणी त्रास देत असल्यास तात्काळ ७०३०६०६०६० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक ओतारी यांनी केले. ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत पोलीस प्रशासनाकडून पुरवली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. या गावभेट ग्रामसंवाद कार्यक्रमाला पोलीस हवालदार अमित राऊळ, नेमळेचे उपसरपंच सखाराम राऊळ, पोलीस पाटील रमेश नेमळेकर, तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर राऊळ, राजा गवस यांच्यासह गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे पोलीस आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यातील संवाद वाढण्यास मदत झाली अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.