
सावंतवाडी : तालुक्यातील सातार्डा गावची कन्या नेहा तुळशीदास मयेकर हिने आपल्या कर्तृत्वाने गावाचे नाव उज्वल केले आहे. आसाममधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (NIPER), गुवाहाटी येथून एम.फार्म (M-Pharm) पदवीमध्ये सुवर्णपदक मिळवून तिने देशातील नामांकित ज़ाइडस (Zydus) या भारतीय बहुराष्ट्रीय फार्मास्युटिकल कंपनीमध्ये संशोधन विभागात अहमदाबाद येथे स्थान मिळवले आहे.
नेहाचे प्राथमिक शिक्षण महात्मा गांधी प्री-प्रायमरी स्कूल, सातार्डा येथे झाले. दहावी आणि बारावीमध्ये तिने प्रथम श्रेणीत यश संपादन केले. त्यानंतर NEET परीक्षा उत्तीर्ण होऊन सावंतवाडी येथील भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमधून तिने उच्च श्रेणीत बी.फार्म (B-Pharm) पदवी घेतली.
पुढे, GPAT-NIPER (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च) सारख्या महत्त्वाच्या परीक्षा उत्तीर्ण करून, शिष्यवृत्ती मिळवत नेहाने देशातील पहिल्या सात फार्मास्युटिकल कॉलेजपैकी एक असलेल्या आसामच्या NIPER, गुवाहाटी येथे दोन वर्षांचे एम.फार्म शिक्षण पूर्ण केले. तिथेही तिने आपल्या बुद्धिमत्तेची छाप पाडली आणि गोल्ड मेडल पटकावले. अलीकडेच आसाम येथे झालेल्या दीक्षांत समारंभात, आसामचे राज्यपाल लक्ष्मीप्रसाद आचार्य यांच्या हस्ते नेहा तुळशीदास मयेकर हिला सुवर्णपदक आणि पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. सातार्डासारख्या एका छोट्या गावातून तिने घेतलेली ही गरुडझेप कौतुकास्पद आहे. तिच्या या उज्ज्वल यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. नेहाच्या या यशाने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे आणि तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.