जिल्हयातील महिला आत्मनिर्भर बनल्या पाहिजेत : निलम राणे

Edited by: दिपेश परब
Published on: April 23, 2024 07:32 AM
views 176  views

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ मोठा आहे, त्यामुळे प्रत्येक घरात राणेंचा प्रचार करण्यासाठी महिलावर्गाला आता कामाला लागायला हवे. राणेंनीच या जिल्ह्याला ओळख दिली. त्यामुळे आपला जिल्हा सर्वच बाबतीत नंबरवन बनविण्यासाठी राणेंसारख्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. आपल्या जिल्ह्यातच युवकांच्या हाताला काम मिळायला पाहिजे, आपल्या जिल्हयातील महिला स्वयंरोजगारातून आत्मनिर्भर बनली पाहिजे हेच आमचे व्हिजन आहे. राणेंना तुमचे मतरुपी आशीर्वाद द्या, असे आवाहन मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी सौ. नीलम राणे यांनी वेंगुर्ले येथे केले.


रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी येथील स्वामीनी मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. आडेली जिल्हा परिषद मतदारसंघ, उभादांडा जिल्हा परिषद मतदारसंघ आणि वेंगुर्ले शहरातील महिलांसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख निता कविटकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या प्रज्ञा परब, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अस्मिता बांदेकर, सुमेधा पाताडे, पंचायत समितीच्या माजी उपसभापती स्मिता दामले, शहर अध्यक्ष श्रेया मयेकर, पंचायत समितीच्या माजी सभापती सारिका काळसेकर, तालुकाप्रमुख प्राची नाईक, सेनेच्या उपजिल्हा प्रमुख उत्कर्षा गावकर, आजगाव सरपंच यशस्विनी सौदागर, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्या सुजाता देसाई, तालुका महिला आघाडीच्या सुजाता पडवळ, माजी नगरसेविका पूनम जाधव, इशा मोंडकर, मठ गावच्या सरपंच रुपाली नाईक, वेतोरे सरपंच प्राची नाईक, परबवाडा सरपंच शमिका बांदेकर, अणसूरच्या उपसरपंच वैष्णवी मालवणकर आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.


गेली अनेक वर्षे नारायण राणे राजकारणात आहे. मी एक साधी गृहिणी आहे. राणेंचे शेकडो कार्यकर्ते हे माझ्या कुटुंबाचाच भाग आहे. राजकारणातले डावपेज मी जाणत नाही. फक्त निवडणुका आल्या की प्रचाराची एक बाजू संभाळण्यासाठी मी स्वतःहून पुढे येते. आतापर्यंत या जिल्ह्याची सून म्हणून जिल्हावासीयांकडून आपल्याला अमाप प्रेम मिळाले. दोन्ही मुलांवरही जिल्हावासीयांनी राणेंएवढेच केले. हे प्रेम यापुढेही असेच दिसू देत.  ही निवडणूक देशाचे भवितव्य घडविणारी असल्याने तोलामोलाचा माणूस संसदेत जाणे गरजेचे आहे. राणेंमध्ये जिल्हयाचा कायापालट करण्याचे व्हिजन आहे. त्यामुळे विकासाची चिंता करणे सोडून द्या. राणेंना मतदान म्हणजेच विकासाला मतदान असेही यावेळी पुढे बोलताना नीलम राणे म्हणाल्या.


राणेंच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या या महिला मेळाव्याला उभादांडा जिल्हा परिषद मतदारसंघ, आडेली जिल्हा परिषद मतदारसंघ आणि वेंगुर्ले शहरातील असंख्य महिला उपस्थित होत्या. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, भाजपचे तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे अध्यक्ष मनिष दळवी, मच्छीमार नेते वसंत तांडेल आदींसह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हा महिला मेळावा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष सुषमा खानोलकर यांनी केले, तर आभार भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ यांनी मानले.