आपले हक्क, अधिकार समजणे काळाची गरज! -- न्या. पी. आर. ढोरे

कुडाळ येथे कायदेविषयक जनजागृती कार्यशाळा संपन्न
Edited by: रुपेश पाटील
Published on: November 08, 2022 16:22 PM
views 187  views

कुडाळ : न्यायालयीन प्रक्रियेत वाटचाल करताना आपले हक्क व आपला अधिकार प्रत्येकाला समजणे काळाची गरज आहे. कायद्याचे पालन कसे करावे? जनतेमध्ये कायदेविषयक माहिती कशी देता येईल? यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन कुडाळ दिवाणी न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश पी. आर. ढोरे यांनी कायदेविषयक जनजागृती कार्यशाळेत केले.

 सकल भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग व दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर कुडाळ यांच्यावतीने  कुडाळ तालुका पंचायत समिती व कुडाळ तालुका बार असोसिएशन यांच्या सहकार्याने कायदेविषयक  जनजागृती कार्यशाळेचे आयोजन पंचायत समिती कुडाळच्या  सभागृहात करण्यात आले होते.

कार्यशाळेचे उद्घाटन सहदिवाणी न्यायाधीश पी. आर. ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पंचायत समिती प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण ,ज्येष्ठ वकील अॅड. राजीव बिले, अॅड. महेश कुंटे, अॅड. विवेक मांडकुलकर, अॅड. भुवनेश प्रभूखानोलकर, कुडाळ न्यायालयाच्या श्रीमती ए. बी. अडुळकर, पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब, कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, ग्रामपंचायत ग्रामसेवक, विस्तार अधिकारी पंचायत समिती,  कर्मचारी वर्ग आदी मोठया संख्येने उपस्थित होते.

 यावेळी बोलताना सहदिवाणी न्यायाधीश ढोरे म्हणाले, कायदेविषयक जनजागृती विविध कार्यक्रमातून विविध स्तरावर केली जाते. आपले हक्क व आपल्या अधिकारासह कायद्याचे पालन कसे करावे, कायद्याचे महत्त्व, जनतेतील प्रत्येक घटकांमध्ये कायदा कसा पोहोचावा? यासाठी जनजागृतीतून आपला प्रयत्न महत्त्वाचा आहे. देशात, राज्यात कायदेविषयक जनजागृती सुरू आहे. त्याचा अभ्यास सर्वसामान्य घटकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 ज्येष्ठ वकील अॅड. राजीव बिले यांनी मध्यस्थीबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न मध्यस्थीच्या माध्यमातून होत असतो. मध्यस्थीच्या माध्यमातून अनेकांचे  संसार आम्ही वाचवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मध्यस्थ निर्माण करताना संशयाचे  वातावरण निर्माण करू नये, असे सूचित करताना एकमेकांच्या चेहऱ्यावर आनंद कसा निर्माण होईल, हे मध्यस्थीच्या माध्यमातून स्पष्ट केले. अॅड. कुंटे यांनी कायदेशीर मार्गदर्शन करताना करार कायदे, पोस्को कायदा, दैनंदिन जीवनातील अनेक कायदे यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अॅड. विवेक मांडकुलकर यांनी पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवरील आपत्कालीन परिस्थिती, इतर उद्भवणारे कायदे व उपाय याबाबत सखोल मार्गदर्शन केले तर अॅड. भुवनेश प्रभूखानोलकर यांनी तृतीय पंथबाबत विस्तृत मार्गदर्शन करताना त्यांचे अधिकार, संरक्षण याबाबत मार्गदर्शन केले.

प्रास्ताविकात गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी कायद्याचे ज्ञान प्रत्येकाला असले पाहिजे. कायद्याची जनजागृती तळागाळात पोचली पाहिजे. नागरिकांचे सशक्तीकरण, त्यांचे हक्क मिळवून देणे हे कायद्याच्या माध्यमातून घडत असते, असे स्पष्ट केले. सूत्रसंचालन श्रीमती अडूळकर यांनी केले. कृषी अधिकारी प्रफुल वालावलकर यांनी आभार मानले.