
सावंतवाडी : कोकण रेल्वे महामंडळाकडे निधी नसल्याने सावंतवाडी रेल्वे टर्मिनसची निर्मिती तूर्तास शक्य नाही या खासदार विनायक राऊत यांच्या ताज्या व्यक्तव्यावरुन नेते मंडळीची सावंतवाडी टर्मिनसच्या कामाविषयीची उदासीनता दिसून येते. सावंतवाडी टर्मिनसच्या कामासाठी निधीची कमतरता पेक्षा राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे असं मत माजी आमदार जयानंद मठकर यांचे सुपुत्र प्रशांत मठकर यांनी व्यक्त केले आहे.
ते म्हणाले, या संदर्भात कोकण रेल्वे महामंडळाने माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केल आहे की सावंतवाडी टर्मिनसच्या कामासाठी एकूण 18.56 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या तरतुदी अंतर्गत मंजूर कामापैकी स्थानक इमारतीचे नूतनीकरण वगळता टर्मिनससाठी आवश्यक ती सर्व कामे पूर्ण झाली आहेत आणि ऑपरेशनल आवश्यकता भासत नसल्याने स्थानक इमारतीचे नूतनीकरण आणि त्यासाठी शिल्लक 8.14 कोटी रुपये तरतुदीच्या खर्चाची जरूरी महामंडळाला वाटत नाही. महामंडळाकडून मिळालेली ही माहिती विचारात घेता सावंतवाडी टर्मिनसचे काम निधी अभावी अपुरे राहावे हे पटण्यासारखे नाही. महामंडळाने दिलेली ही माहिती बरोबर असेल तर मंजूरी आणि निधी उपलब्ध असतानाही टर्मिनस इमारतीच काम का झाल नाही ? आणि शिल्लक निधी कोणत्या कामासाठी वापरला गेला ? याचा जाब नेते मंडळीनी महामंडळाला विचारणं जरूरी आहे. टर्मिनसच्या उर्वरित कामाचा मुद्दा बाजूला ठेवून विचार करता, महामंडळाच्या म्हणण्याप्रमाणे टर्मिनससाठी आवश्यक ती सर्व कामे पूर्ण झाली असताना सावंतवाडी स्थानकावर जास्त गाड्यांना थांबे देण्यात महामंडळ चालढकल का करीत आहे ? हा प्रश्न आहे.
रेल्वेमार्गाच दुपदरीकरण, कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण या झाल्या दूरच्या गोष्टी. तूर्तास सावंतवाडी आणि आसपासच्या तालुक्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी सावंतवाडी स्थानकावर जास्त गाड्यांना थांबे देणे, स्थानकावर सुविधा पुरवण, तुतारी एक्सप्रेससारखी फक्त कोकणातील प्रवाशांसाठी आणखी एखादी गाडी सुरू करण्यासाठी प्रयत्न करण याकडे सर्व नेतेमंडळीनी तातडीने लक्ष दिलं तरी पुरे आहे. त्यासाठी निधीची नाही तर प्रयत्न आणि इच्छाशक्तीची आवश्यकता आहे आणि या भागातल्या नेतेमंडळीनी ती दाखवायची हीच वेळ आहे असं मत श्री. मठकर यांनी व्यक्त केले आहे.