LIVE UPDATES

विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आवश्यकता : सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे

सायबर गुन्हे - अंमली पदार्थ विषयक मार्गदर्शन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 25, 2026 12:31 PM
views 18  views

देवगड :  सायबर गुन्ह्यापासून संरक्षण आणि अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांपासून बचाव  करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन देवगड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे यांनी केले. जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत देवगड पोलीस ठाण्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या सायबर सुरक्षा व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

याप्रसंगी विचारमंचावर प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील जाधव, महिला पोलीस हवालदार सविता लाड, देवगड येथील ग्लोबल स्टडीजच्या संचालिका स्नेहा गावडे, संकेत कॉम्प्युटरचे संचालक श्रेयस कुबल आदि मान्यवर उपस्थित होते.

तंत्रज्ञानाचा वाढत वापर लक्षात घेता सायबर सुरक्षेबाबत जागरूकता आणि अंमली पदार्थापासून दूर राहण्याची जबाबदारी विद्यार्थ्यानी स्वीकारणे काळाची गरज असल्याचे बंगडे म्हणाल्या. विद्यार्थ्यानी डिजिटल जगात सावध राहावे आणि निरोगी, व्यसनमुक्त जीवनाचा स्वीकार करावा, या संदेशातून देवगड पोलीस ठाण्याने हा जनजागृतीचा प्रभावी उपक्रम राबवला.

स्नेहा गावडे - श्रेयस कुबल यांनी अंमली पदार्थाच्या दुष्परिणामासंदर्भात फिल्म व सायबर सुरक्षेबाबत पीपीटी दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी केले.