
रत्नागिरी : पंचायत समितीचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) माजी जिल्हाध्यक्ष आणि उद्योजक सुहास वामन तथा कुमार शेटये यांचे आज दुपारी निधन झाले. खासगी रुग्णालयात तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उच्च रक्तदाबाने ते आजारी होते. परंतु आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
शुक्रवार दि. २७ डिसेंबर रोजी दुपारी उपचारादरम्यान कुमार शेट्ये निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६४ वर्षे होते. त्यांच्या निधनाने रत्नागिरीच्या राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. काही दिवस ते मुंबईत उपचार घेत होते. त्यानंतर त्यांना रत्नागिरीत दाखल करण्यात आले. रत्नागिरीत उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातवंडे, भाऊ असा मोठा परिवार आहे.
सुरवातीला कॉंग्रेसचे पदाधिकारी म्हणून ते काम करत होते. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद देण्यात आले. त्यांनी राष्ट्रवादीची चांगली ताकद रत्नागिरीत उभी केली. २००४ मध्ये कुमार शेट्ये यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळणार होती, परंतु त्यांनी उदय सामंत यांना उमेदवारी देण्यास सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून कुमार शेट्ये परिचित होते. पंचायत समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी चांगले काम केले. त्यांचा गावागावांत चांगला संपर्क होता.