दोडामार्गात राष्ट्रवादीनं दाखवली ताकद ; मेळाव्यास कार्यकर्त्यांची गर्दी !

खा.सुप्रिया सुळेंसमोर अर्चना घारेंनी मांडल्या मतदारसंघातील व्यथा
Edited by: विनायक गावस
Published on: October 27, 2023 14:16 PM
views 142  views

दोडामार्ग : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ कार्यकर्ता मेळावा राष्ट्रीय अध्यक्ष संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत दोडामार्ग तालुक्यात पार पडला. कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या मेळाव्यास लाभला. सगळ्या नोकऱ्या, कंपन्या, उद्योग सगळे गुजरातला गेले. फिल्म इंडस्ट्री उत्तरप्रदेशमध्ये, कोणीही येऊन टपरी मारून जावं हे नाही खपवून घेणार, हे खोके सरकारला ते चालत असेल पण महाविकास आघाडीला नाही चालणार असं विधान खा. सुप्रिया सुळे यांनी केले. तर अर्चना घारे यांच काम, युवती राष्ट्रवादी ते इथवरचा प्रवास पाहुन अभिमान वाटतो. पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अर्चना घारे यांच्या उमेदवारीबाबत केलेली मागणी महाविकास आघाडीच्या बैठकीत ताकदीनं मांडणार असल्याचे त्या म्हणाल्या. येथील कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. 

त्या म्हणाल्या, मी स्वाभिमानी मुलगी आहे. हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा आहे. महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकला नाही, झुकणारही नाही.  मराठी माणूस कोकणी माणूस स्वाभिमानी आहे. इथून पुढे नोकऱ्या उद्योग धंदे बाहेर गेल्यास खोके सरकार आणि मुख्यमंत्री यांना घराबाहेर पडू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ कार्यकर्ता मेळावा राष्ट्रीय अध्यक्ष संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पार पडला. या मेळाव्यास पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी केली होती. सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला तालुक्याच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी प्रास्ताविक व्यक्त करताना मतदारसंघातील व्यथा मांडल्या. तर संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या आगमनानं सिंधुदुर्गात नवचैतन्य निर्माण झाल असून कोकणात राष्ट्रवादीच वैभव पुन्हा मिळवून देऊ असा विश्वास अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केला‌. त्या म्हणाल्या, महिला खासदार असणाऱ्या संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राचा आवाज देशात बुलंद केला. आज त्यांच जंगी स्वागत या ठिकाणी झालं. सावंतवाडी मतदारसंघात तीन तालुके येतात. हा मोठा मतदारसंघ आहे. शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग कोकणात आहे. कोकणातील अर्थकारण बदलण्यात शरद पवार यांचा वाटा मोठा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. भाजपला भिती वाटत असल्यानं निवडणूका घेतल्या जात नाही आहेत. महागाई, बेरोजगारी असे प्रश्न मतदारसंघात आहे. पुणे, मुंबई, गोव्यात येथील मुलांना नोकरीच्या शोधात जावं लागतं आहे‌. आडाळी एमआयडीसीत एखादा प्रकल्प आला तर रोजगार मिळेल. त्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी मागणी त्यांनी  केली. तर इथली आरोग्याची सुविधा व्हेंटिलेटरवर आहे. पाणी प्रश्न, वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांवर होणारे हल्ले, नुकसान असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. इथल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. तो न्याय राष्ट्रवादी पक्ष देऊ शकेल. कोकणात बदल घडवायचा असेल तर तो शरद पवारच करू शकतात असं मत व्यक्त केल‌. तर सुप्रिया सुळे यांच्या आगमनानं पक्षात नवचैतन्य निर्माण झाल असून राष्ट्रवादीच वैभव पुन्हा मिळवून देऊ असा विश्वास अर्चना घारेंनी व्यक्त केला. 


पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस यांनी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांना उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी केली. ते म्हणाले, पाच वर्षांपूर्वी मतदारसंघात आलेल्या अर्चना घारे-परब घराघरात पोहोचल्या आहेत. संकटं काळात लोकांमध्ये जात आधार म्हणून उभ्या राहत आहेत. त्यामुळे त्यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी करत नको दादा, नको भाई आता फक्त अर्चना ताई अशी घोषणा त्यांनी दिली.


ज्येष्ठ नेते सुरेश दळवी यांनी मनोगत व्यक्त केले. सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहेत. देशात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. भविष्यात त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, शरद पवार यांनी सुरू केलेल्या फलोत्पादन योजनेमुळे येथील शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. शरद पवार यांच्यामुळे शेतकरी कृषी संपन्न होऊ शकला. पुलोदच्या स्थापनेवेळी शरद पवार या ठिकाणी पहिल्यांदा आले होते. नंतरच्या काळातही त्यांनी दोडामार्ग तालुक्यात भेट दिली. धरणग्रस्तांच्या उपोषणावेळी ते आले होते. येथील लोकांच्या भावना ऐकून घेत त्यांनी तोडगा काढला होता. आज सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहेत. देशात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. भविष्यात त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर अर्चना घारे-परब या गेली पाच वर्षे राष्ट्रवादी पक्ष तळागाळात पोहचवत आहेत. त्यांना आमदार जाहीर करा, निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेतो. सिंधुदुर्गातून पहिली महिला आमदार विधानसभेत पाठवतो असं मत व्यक्त सुरेश दळवी यांनी व्यक्त केले.

 

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर तोफ डागली. तर अर्चना घारेंना उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी केली.ते म्हणाले, आमच्या जिल्ह्याच्या प्रगतीत सिंहांचा वाटा शरद पवार यांचा राहीला आहे. मी त्याचा साक्षीदार आहे. मला पालकमंत्री, दोनवेळा मंत्रीपद शरद पवार यांनी दिलं. फलोत्पादन योजनेतून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्याच काम शरद पवार यांनी केल. शरद पवार यांच्या दुरदृष्टीचा लाभ आपण आजही घेत आहोत. आम्हाला मिळालेले आमदार फक्त मंत्रीपद गाठतात. विश्वास मिळवून मंत्री होतात आणि नंतर घात करतात असा टोला त्यांनी दीपक केसरकर यांच नाव न घेता लगावला. एकनाथ शिंदेंनी यांना मंत्री केलं‌. पण, आता खासदारकीसाठी मोदी शहांचा जप ते करत आहेत असा हल्लाबोल केला. आपल्याला काम करणारा आमदार हवा आहे. अर्चना घारे-परब यांच्या माध्यमातून तो आमदार जनतेला मिळू शकतो. त्यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी त्यांनी केली.

 

निरीक्षक शेखर माने यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना राष्ट्रवादीला गतवैभव मिळवून देत पक्षाला नंबर एकला आणण्याचा प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं ते कोकणात येऊन पहावं. तीन पक्षाची टोळी राज्यात काम करत आहे. भाजपला लोकांनी ओळखल आहे‌‌. त्यांना सत्तेपासून लांभ ठेवतील. सर्वेचा रिपोर्ट चांगला आहे. आता महाविकास आघाडीची लाट येणार आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास कोकण पक्षनिरीक्षक शेखर माने यांनी व्यक्त केला.


 ज्येष्ठ नेते, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डॉंन्टस यांनी आपलं मत व्यक्त केले. ते म्हणाले, आदरातिथ्य कसं करावं हे सुप्रिया सुळे यांच्याकडून शिकाव लागेल. आपला जिल्हा स्वाभिमानी जिल्हा आहे. विचारवंतांना इथून निवडून दिलं आहे. इथे गद्दारांना स्थान नाहीय. भाजपला लोक कंटाळले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस येत्या काळात पुन्हा उभारी घेईल. अर्चना घारे चांगल काम करत आहेत. पाच वर्षांत लोकसेवेत काम केलं. आजची उपस्थितीच सर्वकाही सांगून जात आहे. त्यांना उमेदवारी दिल्यास क्रांती घडेल असा विश्वास व्हिक्टर डॉंन्टस यांनी व्यक्त केला.


 जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले, ही गर्दी पैसे देऊन बोलवलेली नाही‌. झब्ब्याच्या खिशात पैसे मोजून आणलेली ही लोकं नाहीत‌. शरद पवार यांच्यावर असलेलं हे प्रेम आहे‌. तुमच्या रूपानं साक्षात शरद पवारच आल्यासारखे आहे‌. कितीही वाईट दिवस आले तरी आम्ही तुमची साथ सोडणार नाही. अनेक निवडणूका आम्ही लढतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपला असं इथं म्हंटले जात. परंतु, निवडणूकांत मित्रपक्षांना आमची गरज का लागते ? याच उत्तर देखील दिलं पाहिजे. महाविकास आघाडीला आमचा विरोध नाही. परंतु, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं मत जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी व्यक्त केले‌. अर्चना घारेंना उमेदवारी दिली तर निश्चितच त्या निवडून येतील. जर सावंतवाडी आम्हाला तिकीट मिळालं नाही. तर दोन मतदारसंघात त्याचा परिणाम दिसेल हे शिवसेना, कॉंग्रेसनही ध्यानात ठेवावं. तुमच्या पेक्षा वरिष्ठ कुणी नाहीत. हा पक्ष महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीसाठी मागून घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.


याप्रसंगी खा. सुप्रिया सुळे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ज्येष्ठ नेते सुरेश दळवी, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, व्हिक्टर डॉंन्टस, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, निरीक्षक शेखर माने, नम्रता कुबल, महीला अध्यक्ष रेवती राणे, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, संदीप गवस, सावली पाटकर,प्रदीप चांदेलकर, महादेव देसाई, ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंद महाले, शहराध्यक्ष सुदेश तुळसकर, गौतम महाले, पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, सागर नाईक, सुभाष लोंढे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते