राष्ट्रवादी काँग्रेसला कुठल्याही वकीलीची गरज नाही

मंत्री दीपक केसरकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचं प्रत्युत्तर !
Edited by: भरत केसरकर
Published on: January 09, 2023 12:00 PM
views 203  views

सिंधुदुर्ग : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करण्यात धन्यता मानतात. त्यांनी स्वतःच्या मनाला विचारावे की आपण राजकारणात कुणामुळे नावारूपाला आलो,पण सत्तेसाठी पछाडलेल्या केसरकर यांना तो विसर पडला असून डोळ्यावर गांधारीची पट्टी बांधून राजकारण करत आहेत, ज्या वेळी ही पट्टी काढतील त्यावेळी राष्ट्रवादी ही काय चीज आहे हे समजेल पण त्यावेळी वेळ गेलेली असेल.अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केली आहे.

मंत्री केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवार यांना लक्ष केले होते.यावर पिळणकर यांनी केसरकर यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दीपक केसरकर तुम्हाला शरद पवारनी काय नाही दिले ? तुमचे बेगडी प्रेम ठाऊक असुनही पवार तुमच्या हट्टापायी प्रविण भोसले, संदेश पारकर, भास्कर जाधव यांच्यासारखे समाजात मासबेस (मातब्बर ) तसेच जनाधार असलेल्या नेत्यांना बाजूला ठेवून जिल्ह्याची जबाबदारी आपल्या शिरावर पवार साहेबांनी दिली, दोन वेळा तुम्हाला आमदार केले, तरीपण तुमची राजकीय इच्छा तृप्त झाली नाही, प्रत्येक वेळी पक्षांतर्गत अन्य पदाधिकाऱ्यांवर स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कुरघोडी करण्यातच धन्यता मानली.

जिल्ह्यात ज्यांनी तुम्हाला नावलौकिक मिळवून देण्यासाठी हातभार लावला त्यांनाच राजकारणातून नामशेष करण्यासाठी कुटील नीतीचा अवलंब करून स्वार्थ साधण्यासाठी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अघोषित बंड पुकारून स्वार्थासाठी फक्त राणे कुटुंबीयांना विरोध म्हणून शिवसेनेची वाट धरली, पण आज त्याच राणे कुटुंबाच्या पंगतीत बसून गोडवे गात आहात, त्यांच्या विरोधात दहशतीची सतत टिमकी वाजवून आपणच स्वार्थी दहशत निर्माण करत होता,आज तो चेहरा कुठे लुप्त झाला,

    शिवसेने सुद्धा मानसन्मान राखून मंत्री पद दिले, पाच वर्षे मंत्रीपदाचा आस्वाद घेतला, २०१९ ला पून्हा शिवसेनेने उमेदवारी देऊन आमदार केले, पण तुमच्या कुटिल नीतीची कदाचित उद्धव ठाकरे यांना जाणीव झाली असेल म्हणून २०१९ ला तुमची मंत्री पदावरून गच्छंती केली, पण राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जसे तुमचे अंतरंग शेवटी पवार साहेबांना अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसला दाखविले तेच रंग तुम्ही उद्धव ठाकरे यांना अर्थात शिवसेनेला दाखवून शिंदे गटाची वाट धरून शिंदे गटाची वकिली सुरू केली आहे,अशा गद्दार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर टीका करून आपले हसे करून घेऊ नये, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण कोणत्या पक्षाचे उमेदवार असाल याबाबत तुमच्यातच संभ्रमावस्था असल्याचे दिसत आहे,आणि त्याची कुजबुज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडताना जे प्रामाणिक कार्यकर्ते आपले नेतृत्व स्वीकारून शिवसेनावासी झाले त्यातील किती कार्यकर्ते आता आपल्या सोबत आहेत, याचे आत्मपरीक्षण करावे नंतरच राष्ट्रवादी काँग्रेस वर टीका करावी,असे सडेतोड उत्तर सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत भाई पिळणकर यांनी दिले आहे.