
सावंतवाडी : शहरातील वीज पुरवठा सध्या वारंवार खंडित होत असल्यानं राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत उप कार्यकारी अभियंता संदीप भुरे यांना घेराव घालत जाब विचारला. वीज वितरण कार्यालयाला धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. वारंवार लाईट जात आहे, हा लोडशेडींगचा प्रकार नाही ना ? असा सवाल यावेळी त्यांनी केला.
दरम्यान, लोड शिफ्टींगमुळे वीज पुरवठा वारंवार खंडित करावा लागत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, यापुढे अशा कोणत्याही प्रकार लाईट जाणार नसल्याचा ग्वाही यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. तर लोड शिफ्टींगमुळे लाईट जाणार असेल तर त्याची पूर्व कल्पना जनतेला द्या, प्रसिद्ध माध्यमातून ते जाहीर करा, अन्यथा पुन्हा जनतेच्या रोषाला सामोरे जावं लागेल याची जाणीव असूद्या असं मत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. यावेळी शहराध्यक्ष देवा टेमकर, उद्योग व व्यापार कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, बाबल्या दुभाषी, राकेश नेवगी, इफ्तेकार राजगुरू, याकुब शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.