नौदलाचा मच्छिमार बांधवांशी संवाद !

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 13, 2024 07:15 AM
views 110  views

सिंधुदुर्गनगरी :  नौदल तर्फे महा कनेक्ट कार ड्राईव्ह २०२४ हा उपक्रम ८ ते १८ जुलै दरम्यान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत  जिल्हातील सर्व सागर रक्षक दल सदस्य, मच्छिमार बांधव यांना सागरी सुरक्षेचे महत्व तसेच  भारतीय नौदलामध्ये प्रवेश करण्याबाबतचे मार्गदर्शन मालवण येथे करण्यात आले.  मासेमारी समुदाय, सागर रक्षक दलाच्या समस्या तसेच किनारपट्टी सुरक्षेच्या मुद्द्यांवर सामुदायिक संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

       नौदलाच्या कमांडर आसिफ मुल्ला,कमांडर सौजन्या श्री, कमांडर अंकेश बुंदेला यांनी इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस घ्यावयाची काळजी, मासेमारी करताना घ्यावयाची काळजी, कलर कोडींग, आपत्कालीन परिस्थितीमध्ये घ्यावयाची काळजी, सागर सुरक्षा, भारतीय नौसेनेमध्ये नोकरीच्या संधी अशा विविध विषयांवर तसेच मच्छीमार समुदाय व सागर रक्षक दलाच्या तसेच किनारपट्टी सुरक्षेच्या मुद्द्यावर सामुदायिक संवाद साधून मार्गदर्शन केले. संवाद या नौदलाच्या कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे मालवण पोलिस ठाणे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे,मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी रवींद्र मालवणकर, सहाय्यक बंदर निरीक्षक अरविंद परदेशी, पोलीस पाटील, सागर रक्षक दल सदस्य,मच्छिमार समुदाय, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.