हुसेन लांजेकर यांना राष्ट्रीय आदर्श उद्योगरत्न गौरव पुरस्कार

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोइली यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 30, 2023 19:50 PM
views 224  views

वैभववाडी  : नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव व इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगाव यांच्यावतीने भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तथा युवा उद्योजक हुसेन लांजेकर यांना राष्ट्रीय आदर्श उद्योगरत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बेळगाव येथे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोइली यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.  

देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तिमत्त्वाचा नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव व इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगाव यांच्यावतीने पुरस्कार देऊन गौरव केला जातो. दिल्ली, गुजरात, कर्नाटक व महाराष्ट्र राज्या मधून निवडक व्यक्तींची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. राजकीय, उद्योग, क्रीडा व शासकीय अधिकारी या क्षेत्रातील व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. राष्ट्रीय उद्योगरत्न पुरस्कारासाठी श्री लांजेकर यांची निवड करण्यात आली. बेळगाव येथे हा पुरस्कार वितरित करण्यात आला.या सोहळ्याला केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, कर्नाटक खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख बिदर महेश मेघनार, राजू शिंगाडे, अरविंद घट्टी व अधिकारी उपस्थित होते.

पुरस्कार प्राप्त हुसेन लांजेकर यांना विशेष प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, म्हैसूर फेटा, चंदनाचा कायमस्वरूपी हार व भारत सरकार केंद्रीय मंत्री यांचे अभिनंदन पत्र देऊन गौरविण्यात आले. हुसेन लांजेकर हे कोळपे गावचे रहिवासी आहे. मुस्लिम समाजाचा प्रामाणिक कार्यकर्ता अशी ओळख त्यांची संपूर्ण जिल्ह्यात आहे. अनेक वर्ष ते सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.  भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदावर ते सध्या कार्यरत आहेत, जिल्हा मुस्लिम संघटनेत देखील त्यांचे फार मोठे योगदान आहे. कोळपे गावच्या विकासामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. पंचवीस वर्ष सामाजिक व राजकीय चळवळीत स्वतःला झोकून घेत काम करणाऱ्या हुसेन लांजेकर यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, मुस्लिम संघटना, वैभववाडी तालुक्यातील नागरिक यांच्याकडून अभिनंदन केले जात आहे.