नरसोबाचीवाडी - पंढरपूर - अक्कलकोटच्या मंदिरात वेंगुर्लेतील अचानक मंडळाची भजन सेवा..!

Edited by: दिपेश परब
Published on: August 18, 2023 15:58 PM
views 295  views

वेंगुर्ला : अधिक श्रावण महिन्याचे औचित्य साधून वेंगुर्ले येथील संदेश निकम मित्रमंडळाचे संस्थापक व माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांच्या सहकार्याने अचानक भजन मंडळ वेंगुर्ले यांच्या वतीने नरसोबाचीवाडी येथील जागृत व प्रसिद्ध श्री दत्तमंदिर तिर्थक्षेत्रावर, पंढरपूरच्या प्रसिद्ध श्री विठ्ठल मंदिर व अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरात १६ व १७ ऑगस्ट रोजी मंदिर व्यवस्थापनाची परवानगी घेत भजन सेवा केली.

अधिक श्रावण मासात भक्ती भावाने सेवा करण्याऱ्या भाविकांना त्याचे चांगले फळ मिळते. असे अध्यात्मिक अभ्यासकांकडून सांगितले जाते. यामुळे नरसोबाचीवाडी या तिर्थक्षेत्रावर बुधवारी १६ ऑगस्ट रोजी शेकडो भाविक दर्शनासाठी व पुजा-पाठ करण्यासाठी दाखल झाले होते. वेंगुर्लेतील अचानक भजन मंडळाच्या सदस्यांनी तब्बल एक तास सादर केलेल्या भजनाचा आनंद भाविकांनी ते भजन ऐकण्यासाठी बसून लुटला. अचानक भजन मंडळाच्या भजनी वारकऱ्यांचे कौतुक केले.

यानंतर १७ रोजी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर ठिकाणी व  अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात या अचानक भजन मंडळाच्या वतीने भजन सेवा करण्यात आली. यावेळी सुद्धा अनेक भाविकांनी भजन ऐकण्याचा आनंद लुटत उदंड प्रतिसाद दिला