
कुडाळ : माझ्या जीवनात आणि राजकीय कारकीर्दीत आजचा दिवस विशेष असा आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीने राणे कुटुंबाने हे यश मिळवलेले आहे. आजच्या निलेश राणे व नितेश राणे यांच्या यशाचे श्रेय मी दोन्ही मतदार संघातील मतदार आणि कार्यकर्त्यांना देतो याबरोबरच या दोघांची मेहनतही तेवढीच आहे. आमच्यासाठी काहीही करण्यासाठी तयार असणारे प्रेमळ कार्यकर्ते ही आमची ताकद आहे. त्या १० वर्षाबाबत मी बोलणार नाही. १० वर्षाच्या काळात त्यानी काय केले? जर लायक माणूस असता तर जनतेचा विकास दिसता असता. आज एक मंत्री बनवायला सरकारला तुम्हीच भाग पाडले, दुसरा आमदार आहे.
आम्हाला सिंधुदुर्ग वासियांचे ऋण फेडायचे आहे. जिल्हयाचा विकास होणे महत्वाचे आहे. आम्हाला सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात नावारूपास आणायचा आहे यासाठी पुढील ५ वर्षात जनतेने साथ दिली तर सर्व शक्य आहे. यश मिळविणे सोपे आहे, पण यश टिकविणे कठीण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलं मुली उद्योजक होऊन सिंधुदुर्ग जिल्हा सुजलाम सुफलाम व्हावा अशी माझी इच्छा आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी आताचा पुढचा काळ सहकार्य करा." असे प्रतिपादन खासदार नारायण राणे यांनी कुडाळ येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.
कुडाळ महायुती पदाधिकाऱ्यांच्या वतीने मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री श्री. नितेश राणे आणि नवनिर्वाचित आमदार श्री. निलेश राणे यांचा भव्य सत्कार सोहळा रविवारी सायंकाळी कुडाळ येथे करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना खासदार नारायण राणे यांनी वरील प्रतिपादन केले. तत्पूर्वी मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांचा कुडाळ महायुती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने खासदार नारायण राणे यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर खासदार नारायण राणे सौ. निलमताई राणे, आमदार निलेश राणे, मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, भाजपा जिल्हाप्रमुख प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, संजू परब, भाजपा जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काका कुडाळकर, भाजपा कुडाळ तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, महेश सारंग, राजू राऊळ, श्वेता कोरगावकर, संध्या तेरसे, पप्या तवटे, रुपेश कानडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. या सत्कार सोहळ्यासाठी कुडाळ मालवण तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
भव्य सत्कारा नंतर बोलताना नितेश राणे यांनी अशा भावना व्यक्त केल्या, " की माझ्यासाठी आजचा दिवस खूप भावनिक आहे. कुणाल मालवणच्या जनतेच मी कौतुक करतो. तुम्ही निवडून दिलेल्या आमदार निलेश राणे यांचा अधिवेशनातील चार ते पाच दिवसाचा झंजावात पाहता आपण निवडून दिलेल्या प्रभावी प्रतिनिधी कशाप्रकारे तुमचे प्रश्न मानतो हे सर्वांनी पाहिले. येत्या पाच वर्षात कुणालचा एकही प्रश्न उर्वरित राहणार नाही अशी तुम्हाला ग्वाही देतो. तुम्ही टाकलेला विश्वास आम्ही कुठेही कमी पडू देणार नाही हा विश्वास जिल्ह्यातील जनतेला आज या ठिकाणी मी देतो. 2014 पर्यंत राणीसाहेबांनी जिल्ह्याला ज्या उंचीवर नेऊन ठेवलेलं त्या उंचीवर पुन्हा नेऊन ठेवायचं आहे. तुम्ही एका आमदाराला निवडले त्यावर एक मंत्रीपद मिळाले." असे सांगतानाच "कुडाळ मालवणच्या विजयाची मॅन ऑफ द मॅच आमची आई आहे" असेही नितेश राणे यांनी प्रतिपादन केले.
तत्पूर्वी आमदार निलेश राणे यांनी सत्कार स्वीकारल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना असे सांगितले की, "आजच्या जगात नितेश सारखा भाऊ मिळण हे फक्त माझ्या नशिबात आहे आणि याचा मला अभिमानही आहे. मंत्री नितेश राणे यांचे यश बघताना भाऊ म्हणून मला अभिमान वाटतो. नितेशचा प्रमाणेपणा ,हुशारी आणि सरळ स्वभाव आणि त्याने घेतलेल्या अथक मेहनतीमुळे आज त्याला यश मिळालेले आहे. नितेश तू खूप मोठा हो , ही अजून सुरुवात आहे तुला खूप मोठा झालेला मला बघायचं आहे. मी सदैव तुझ्या सोबत आहे. या जिल्ह्याने आपल्याला भरभरून दिले आहे आता जिल्हा जे मागील ते आपल्याला उभ करायच आहे. या सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन दादा साईल यांनी केले.