
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचे तिन्ही उमेदवार विजयी होतील. आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वांगीण विकासासाठी झटतोय. विरोधकांना चोख प्रत्युत्तर विकासाच्या माध्यमातून दिले आहे. चिपी विमानतळाला विरोध करणारे विनायक राऊत यांचे विकासात योगदान नाही असा टोला खासदार नारायण राणे यांनी लगावला आहे.
ते म्हणाले, चिपी विमानतळाचा प्रश्न आम्हीच सोडवू शकतो. मी स्वतः केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्र्यांशी बोललो आहे. येत्या आठवडाभरात हा प्रश्न सुटेल. नवीन विमान वाहतुकही सुरू होईल. त्यामुळे माजी खासदार विनायक राऊत यांनी त्यावर जास्त बोलू नये. विमानतळ करताना विरोध करणारेच आता आम्हाला धडे देत आहेत अशी टीका माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी केली.तसेच मी संपूर्ण महाराष्ट्रात प्रचाराला न जाता फक्त सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई येथेच प्रचार सभा घेणार असल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले. खासदार राणे यांनी अचानक सावंतवाडीला भेट दिली. शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मंदार नार्वेकर, विद्याधर परब, सुरज परब, विनोद सावंत, उत्कर्षा सासोलकर, गुरू सावंत, क्लेटस फर्नांडिस, ज्ञानेश्वर सावंत आदी उपस्थित होते.
विनायक राऊत हे खासदार असताना काही करू शकले नाहीत. आता ते आम्हाला उपदेशाचे डोस देतात. मी भ्रष्टाचार केला म्हणून माझं मंत्रिपद गेल असं सांगतात. पण त्यांनी साडेतीन हजार कोटीची कुठली निविदा माझ्या मंत्रालयाकडून काढली गेली हे तरी सांगावे. ते ज्यांची नावे घेतात ते कधी दिल्लीत पण आले नाहीत. असे असताना भ्रष्टाचार झाला म्हणून राऊत चुकीची माहिती पसरवत आहेत. पण मी गप्प बसणार नाही असा इशारा राणे यांनी दिला. चिपी विमानतळाचा प्रश्न लवकरच सुटेल. त्यांचा करार संपला होता त्याची उशिरा माहिती मला मिळाली. मात्र, आता मी केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्र्यांशी बोललो आहे. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून येत्या आठवडाभरात विमान वाहतूक सुरू होईल असे राणे म्हणाले.
तसेच महायुतीतील तिनही जागा चांगल्या मतांनी निवडून येणार आहेत. मी एक वातावरण निर्मिती करण्यासाठी सावंतवाडीत आलो असून कुणाची कार्यालय कुठे आहेत याची माहिती घेत आहे असा चिमटा ही त्यांनी विरोधकांना काढला. जे विरोधक आमच्यावर टीका करतात त्यांनी साधी जिल्ह्यात बालवाडी तरी काढली आहे का?विकासाचा कुठलं काम केलं ते तरी त्यांनी सांगावे असे आव्हानही राणे यांनी दिले.
मी जरी स्टार प्रचारक असलो तरी संपूर्ण महाराष्ट्रात प्रचाराला मला जाता येणार नाही. पण सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई येथे काही ठिकणी प्रचार सभा मी घेईन असेही राणे यांनी यावेळी सांगितले.