राणे - राऊत रणांगणात !

प्रचाराचं वारं पोहोचलं कोकणवासीयांच्या अंगणात
Edited by: विनायक गांवस
Published on: April 20, 2024 05:22 AM
views 169  views

सावंतवाडी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी शेवटच्या दिवशी 'महायुती'कडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दोन दिवसांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी 'इंडिया आघाडी'कडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 

नारायण राणेंच्या प्रचारार्थ लोकसभा मतदारसंघातील शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार नितेश राणे, आमदार शेखर निकम आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण मैदानात आहेत. यासह माजी खासदार निलेश राणे, शिवसेना नेते किरण उर्फ भैय्या सामंत, माजी आमदार प्रमोद जठार यांसह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, रिपाईची फौज राणेंच्या समर्थनार्थ सरसावली आहे. दुसरीकडे, खासदार विनायक राऊत यांच्यासाठी मतदारसंघातील आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी मैदानात असून आमदार भास्कर जाधव, संदेश पारकर, अतुल रावराणे, सतिश सावंत, अर्चना घारे-परब आदींसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष अशी इंडिया आघाडी विनायक राऊत यांच्यासाठी मैदानात आहे. दोन्हीकडच्या प्रतिस्पर्धींनी उमेदवार अर्ज दाखल केल्यानंतर खऱ्या अर्थानं तळकोकणात राजकीय शिमगा सुरु झाला आहे. त्यात राणे विरूद्ध ठाकरे असा संघर्ष पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे‌. जाहीर सभा, प्रचार रॅली, डोअर टू डोअर प्रचारासह आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी येत्या काही दिवसांत झडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आदींसह दिग्गज नेत्यांच्या सभांच सत्र सुरू राहणार आहे. 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील चिपळूणमध्ये २,६७,८३९, रत्नागिरीत २,८०,९५७, राजापूर २,३१,८९५ तर कणकवली २,२५,५८८, कुडाळ २,१०,३७८, सावंतवाडी २,२१,८१४ असे तब्बल १४ लाख ३८ हजार ४७१ एवढे मतदार आहेत. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी युती, आघाडीकडून शर्थीचे प्रयत्न केले जाणार आहेत. नामनिर्देशन पत्राची छाननी आज 20 एप्रिल 2024 ला होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक 22 एप्रिल आहे. या मतदारसंघातसाठी 7 मे रोजी मतदान होणार असून 4 जून ला मतमोजणी होणार आहे.

एकंदरीतच, पुर्वीच्या राजापूर मतदारसंघ व आताच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री जनरल जगन्नाथराव भोंसले, बॅ. नाथ पै, प्रा. मधू दंडवते, ब्रिगेडीअर सुधीर सावंत, डॉ. सुरेश प्रभू, डॉ. निलेश राणे, विनायक राऊत असे खासदार लोकसभेत निवडून गेले आहेत‌. २०२४ ला कोकणची जनता कुणाला साथ देते ? याकडे लक्ष लागून राहिले आहे. जनता खासदार विनायक राऊत यांना हॅट्रिकची संधी देते की केंद्रीय मंत्री नारायण राणेंना संधी देत मोदींच्या मंत्रिमंडळातील खासदार निवडते ? हे ४ जूनलाच स्पष्ट होणार आहे‌.