
सिंधुदुर्ग : शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर जिल्हा नियोजन मंडळाची पहिली बैठक पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण अन् शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. यानिमित्ताने कट्टर विरोधक असणारे राणे अन् केसरकर एकत्र आले.
बैठक सुरू होण्याच्या काही क्षणापूर्वी हे तीन मंत्री एकत्र एका गाडीत आले होते. पालकमंत्र्यांच्या गाडीत मागच्या बाजूला नारायण राणे व रविंद्र चव्हाण तर पुढील सीटवर दीपक केसरकर बसले होते. जिल्ह्याच्या राजकारणातील ह्या तिन्ही मातब्बर नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्यानं भविष्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय प्रवासाची ही सफर ठरल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातं आहे.