
वेंगुर्ला : राणे व केसरकर यांच्यात वाद लावण्याचं काम राजन तेली यांनी केलं. नारायण राणेंच्या शब्दाची ताकद या मतदार संघात आहे. लोकसभेच्या निवडणुकीत केसरकर यांनी एक ठाम भूमिका घेतली. त्यांनी जो शब्द दिला तो शेवटपर्यंत पाळला व मनापासून त्यांनी काम केलं त्यामुळे त्याची परतफेड करण्याची आता वेळ आहे. या मतदार संघात कोणीतरी यावं व विकासकामांच श्रेय घ्यावं, मंत्र्यांची पत्र घेऊन हे काम मी केलं अस सांगायच हे आता चालणार नाही. या मतदार संघात दीपक केसरकर यांनी भरगोस विकासनिधी आणला आणि महायुतीच्या माध्यमातून हा सर्व निधी आला. याचे श्रेय घेण्याचे प्रयत्न कोणी करू नये. आपल्यात राहुन जो कोणी विरोधी भूमीका घेत असेल त्याची नाव आम्हाला सांगा पुढे आम्ही बघतो असा इशारा मनीष दळवी यांनी मठ येथे महायुतीच्या सभेत बोलताना दिला.
पुढे मनीष दळवी म्हणाले, दीपक केसरकरच पुन्हा का पाहिजेत, तर आज राज्यात कुठेही नसणारी अशी सिंधूरत्न योजना त्यांनी या कोकणात आणली. यामाध्यमातून शेतकरी, महिला, मच्छिमार, युवक यांच्यासाठी कोट्यावधीचे रुपये आणले. शेतकऱ्याला हक्काच्या वस्तू मिळाल्या सर्व विभागाच्या योजना एकत्र आल्या. दशावतारी कलाकारांच्या वाहन व्यवस्थेसाठी 18 ते 20 लाख अनुदान देण्याची व्यवस्था त्यांनी केली. याचा साक्षीदार मी आहे. असा दूरदृष्टी असणारा नेता म्हणजे दिपक केसरकर. जिल्हा बँक म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. अनेक योजना राबवायच्या आहेत यासाठी हक्काचा खासदार तर मिळाला आता हक्काचा आमदार पाहिजे. इथल्या युवकांना रोजगाराची संधी द्यायची असेल तर हे पर्यटनाच्या माध्यमातून होऊ शकत आणि यासाठी केसरकर प्रयत्न करत आहेत. असेही मनीष दळवी म्हणाले.