
सावंतवाडी : वंदे भारतसह मेंगलोर एक्सप्रेस सावंतवाडी रेल्वे स्थानकात थांबण्यासाठी मी स्वतः रेल्वे मंत्र्यांशी बोलेन तसेच चिपी विमानतळावरून होणारी उड्डाणे सुरळीत रहावीत अशी मागणी मी केंद्रीय मंत्र्यांकडे केली आहे अशी माहिती खासदार नारायण राणे यांनी येथे दिली. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगारचा प्रश्न सोडवण्यासाठी भर देण्यात येणार आहे. त्यासाठी दोडामार्ग तिलारी येथे मेडिकल उपकरणे बनविण्याचे कारखाने आणण्याचा माझा मानस आहे. सावंतवाडीच्या मल्टीस्पेशालिटीचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रयत्न नक्कीच करेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नारायण राणे यांनी आज शिवसेना जिल्हा संघटक, माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
सावंतवाडी रेल्वे स्थानकात वंदे भारत थांबत नाही. त्याकडे खास.राणे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, त्या ठिकाणी लोकांची मागणी लक्षात घेता सावंतवाडी रेल्वे स्थानकावर वंदे भारत आणि मेंगलोर एक्सप्रेस थांबण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. त्याबाबत मी स्वतः संबंधित मंत्र्यांशी बोलेन. त्याचबरोबर चिपी विमानतळावरून होणारी उड्डाणे रद्द होऊ नये यासाठी श्री. नायडू या केंद्रीय मंत्र्यांची मी चर्चा केली आहे. लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेतला आहे. जो करार संपला आहे तो पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न दूर करायचा आहे. त्यामुळे मेडिकल वस्तू बनवण्याचे कारखाने दोडामार्ग येथे आणण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मी स्वतः संबंधित कंपन्यांशी बोलत आहे. ते कारखाने आल्यास त्याचा येथील बेरोजगारांना फायदा होणार आहे.