नाणोस जि. प. शाळेतील शिक्षक इतरत्र पाठवू नयेत : सागर नाणोसकर

Edited by:
Published on: June 27, 2023 17:38 PM
views 135  views

सावंतवाडी : नाणोस येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक इतरत्र शाळेत पाठविण्यात येऊ नये, अशी मागणी युवा सेनेचे उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांनी गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांच्याकडे केली आहे. दरम्यान अन्य शाळेत शिक्षक पाठवून शाळेतील मुलांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास शिक्षण मंत्र्यांच्या कार्यालयासमोर शाळा भरविण्यात येईल असाही इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. याबाबतचे निवेदन श्री. नाणोसकर यांनी आज बोडके यांना दिले.

यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की  जिल्हा परिषद शाळा नाणोस नं. १ या शाळेतील शिक्षक दुसऱ्या शाळेमध्ये कामगिरीसाठी पाठविले जात आहे. सद्यस्थितीत या ठिकाणचे शिक्षक इतरत्र पाठवू नये तसेच झाल्यास नाणोस शाळेतील मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. मात्र आपल्या आदेशाने दुसऱ्या शाळेत शिक्षक दाखल झाल्यास सर्व ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेतील मुलांना घेऊन शिक्षण मंत्र्यांच्या कार्यालयासमोर शाळा भरविण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाची शिक्षकांअभावी झालेली दुरवस्था म्हणजे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे अपयश आहे.आज गावागावातील प्राथमिक शिक्षणांची अवस्था काय झाली हे प्रशासनाने पाहणे आवश्यक आहे  तसेच तालुक्यात आवश्यक प्रमाणात पुस्तकांचा पुरवठा झालेला नाही.राज्यात सावंतवाडीचे शिक्षण मंत्री असताना या ठिकाणी बरेच प्रश्न प्रलंबित आहे. जर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना हे प्रश्न सोडवता येत नसतील तर त्यांनी तसे जाहीर करावे त्यासाठी युवा सेनेच्या वतीने आम्ही निश्चितच पुढाकार घेऊ, असे त्यांनी सांगितले.