
कणकवली : नगर पंचायतीतर्फे गटार कामासाठी रेल्वे स्थानकानजीक रस्त्यावर खोदण्यात आलेल्या १२ फूट खोल चरात ज्येष्ठ नागरिक रवींद्रनाथ मुसळे दुचाकीसह पडून जखमी झाले. त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत ठेकेदाराला नगर पंचायतीमार्फत गुरुवारी नोटीस बजावण्यात आली. मुसळे यांचा अपघात व विरोधकांनी केलेले आरोप या अनुषंगाने दोन दिवसांत खुलासा करावा, असे नोटिसीत म्हटल्याची माहिती मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिली. ही अपघाताची घटना रविवार, ११ डिसेंबरला सायंकाळी घडली होती. न. पं. मार्फत गटारकाम सुरु असून त्यासाठी कणकवली-कनेडी मार्गावर १२ फूट खोल व सहा फूट रुंद चर खणण्यात आला होता. चर लक्षात न आल्याने दुचाकीप्रवास करत असलेले मुसळे हे दुचाकीसह चरात कोसळले होते. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर सोमवारी सकाळच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने व अतिमधुमेहाच्या कारणास्तव झाल्याची खबर त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.