
वेंगुर्ला : मला जे जिल्हाप्रमुख पद मिळाले आहे ते मी मानाच नाही तर कामच पद समजतो. सर्वात महत्वाची संघटना आहे. त्यामुळे पक्षात जो प्रामाणिक काम करेल त्याला योग्य सन्मान मिळेल. या जिल्ह्यात २ आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे निश्चितच शिवसेना हा महायुतीतील मोठा पक्ष आहे. आगामी काळात सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका स्वतंत्र शिवसेना म्हणून लढवायच्या आहेत. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे ही माझी भूमिका आहे. मी माझ्या शब्दावर कायम ठाम असतो. ज्यावेळी पक्षाचा विषय येईल तेव्हा पक्ष मोठा मानून काम करा असे आवाहन शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख संजू परब यांनी वेंगुर्ले येथे केले.
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शनिवार दिनांक २९ मार्च रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या आभार दौऱ्यानिमित्त वेंगुर्ले येथील शिवसेना कार्यालयात शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक आज (२४ मार्च) संपन्न झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या दौरा नियोजन वर चर्चा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख ऍड निता सावंत-कविटकर, विधानसभा संपर्कप्रमुख प्रेमानंद देसाई, वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा संघटक सुनील डूबळे, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, महिला तालुकाप्रमुख दिशा शेटकर, कोस्टल विभाग तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, उपजिल्हाप्रमुख सुहास कोळसुलकर, तालुका संघटक बाळा दळवी, महिला शहरप्रमुख ऍड श्रद्धा परब- बाविस्कर, उपतालुकाप्रमुख सलील नाबर यांच्यासाहित इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना संजू परब म्हणाले, वेंगुर्ला तालुक्यात सदस्य नोंदणीला सुरुवात झाली आहे की कौतुकाची गोष्ट आहे. आगामी जिल्हापरिषद स्वतंत्र लढवण्यासाठी त्यापद्धतीची ताकद असणे आवश्यक आहे. यामुळे प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघात किमान २ हजार सदस्य नोंदणी व्हायला हवी व याची जबाबदारी वविभागप्रमुख यांनी घ्यायला हवी. जो पदाधिकारी वारंवार सभेला किंवा मिटिंग ला गैरहजार असेल त्याला त्या पदावरून हटवले जाईल. असा इशाराही संजू परब यांनी दिला.
यावेळी जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच वेंगुर्ले येथे आलेल्या संजू परब यांचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच यावेळी बोलताना नितीन मांजरेकर म्हणाले की, पक्षाच्या कठीण काळात अशोक दळवी यांनी संघटना घट्ट बांधून ठेवण्याचे काम केले. आणि आता संजू परब हे जिल्हाप्रमुख झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह वाढला आहे. आणि निश्चितच त्यांच्या नेतृत्वाखाली या विधानसभा मतदार संघात शिवसेना पक्ष अधिक भरारी घेईल यात शंका नाही. यावेळी सुनील डूबळे, बाळा दळवी, ऍड श्रद्धा परब - बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त केले. युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे यांनी उपस्थितीतांचे आभार मानले.