
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावागावात दूरसंचारचे जाळे विणण्यासाठी १०४ फोर-जी टॉवर मंजूर झाले आहेत, त्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. लवकरच या टॉवरसाठी जागा गावागावात उपलब्ध होईल आणि ते उभारण्यात येतील. त्यामुळे गावात आता मोबाईलचे जाळे दूरसंचारच्या माध्यमातून विणले जाणार आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.
यापूर्वी टू-जी आणि थ्री-जी चे टॉवर मंजूर झाले होते. पण आपण दिल्ली दरबारी कोकणात आणि विशेषत: आता फोर-जी टॉवरची गरज आहे, हे स्पष्ट केले आणि त्यामुळेच हे १०४ टॉवर मंजूर झाले आहेत. त्यामुळे कुठलेही राजकारण न करता आपण गावांच्या विकासासाठी काम करत आहोत, असेही खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. गावागावात कोणतेही राजकारण न करता सर्वांनी एकदिलाने काम करा, असेही ते म्हणाले.
कलंबिस्त गावाला त्यांनी रविवारी भेट दिली. कलंबिस्त राऊळवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात कलंबिस्त पंचक्रोशीतील उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, माजी जि. प. सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, विभाग प्रमुख पुरुषोत्तम राऊळ, माजी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत, सरपंच सपना सावंत, उपसरपंच सुरेश पास्ते, रमाकांत राऊळ, दिलीप राऊळ, बबन सांगेलकर, शाखाप्रमुख दिनेश सावंत, कुसाजी सावंत, अनिल सावंत, निलेश पास्ते, बाळा राजगे, यशवंत सावंत, लक्ष्मण बिडये, रामचंद्र पास्ते, लक्ष्मण राऊळ, मधुकर जाधव, मधुकर राऊळ, मोहन पास्ते, दीपक सावंत, प्रशांत मेस्त्री, महादेव बिडये, राम राऊळ, शेखर मेस्त्री, दीपक जाधव, रिया सावंत, मेघा तावडे, सुप्रिया राऊळ, विजय राऊळ, राजेश सावंत, श्याम राऊळ, लक्ष्मण राऊळ आदी उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच सपना सावंत, उपसरपंच सुरेश पास्ते, दिलीप राऊळ, नामदेव राऊळ, सौ. सांगेलकर आदी नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा तसेच पारपोली येथील गाव विकास पॅनेलमधून निवडून आलेले सरपंच कृष्णा नाईक व उपसरपंच संदेश गुरव यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
यावेळी खासदार राऊत पुढे म्हणाले, कोकणात आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोर-जीची गरज आहे, हे ओळखून आपण दिल्ली इथून फोर-जीचे १०४ टॉवर मंजूर करून आणले आहेत. कलंबिस्त येथे फोर-जी चा टॉवर मंजूर झाला आहे. लवकरच तो जागा उपलब्ध झाल्यावर उभारणीसाठी घेतला जाईल आणि येत्या काही महिन्यात या भागात दूरसंचारचा मोबाईल टॉवर सुरू होईल. सह्याद्रीच्या पट्ट्यात पर्यटनदृष्ट्या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत विकास साधला जाईल. या भागातील रस्ते, पूल, पाणी तसेच बँक सुविधा बाबतही आपण निश्चितपणे लक्ष देऊन ते प्रश्न सोडवले जातील.सावंतवाडी तालुक्यात ५ व ६ फेब्रुवारीला आपण गावातील प्रत्येक ग्रामपंचायतीला भेटी देणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. संतोष सावंत व आभार रमेश सावंत यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.