
सावंतवाडी : माझी लढाई ही कोकणच्या विश्वासाची स्वाभिमानाची आणि अस्मितेची आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातील माघार घेणार नाही हा जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी मी निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले. त्यामुळे जनतेचा आशीर्वाद आणि प्रेम मला विजयापर्यंत घेऊन जाणार असा विश्वास महाविकास आघाडीचा बंडखोर अपक्ष उमेदवार अर्चना घारे यांनी व्यक्त केला. तर मला मिळालेले पाकीट (लिफाफा) या चिन्हात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विकासाचे रोड मॉडेल असणार आहे. त्यामुळे निश्चितच ते प्रत्येकाच्या घराघरात पोहोचेल असेही त्या म्हणाल्या. घारे यांनी आज आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली यावेळी त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, अपक्ष उमेदवारी दाखल करताना जनतेच्या भावना लक्षात घेऊन आपण त्यांना शब्द दिला होता. तो शब्द पूर्ण करण्यासाठी मी माझ्या उमेदवारीवर ठाम राहिले. माझ्यावर या काळात दबाव आला. अनेकांचे फोन आले. पण, विचलित न होता मी माझा उमेदवारी अर्ज कायम ठेवला. माझा लढा हा कोकणच्या विश्वासाचा स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा आहे. त्यामुळे जनतेमधून मला चांगल्या भावना ऐकायला मिळत आहे. लोकांचे फोन आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. बरेच जण मला प्रत्यक्ष भेटून पाठिंबा देत आहेत. त्यामुळे माझा विजय हा निश्चितच आहे.
पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही याचे मला दुःख आहे. परंतु, मी पक्षाच्या नेत्यावर नाराज नाही. त्यांच्या आशीर्वादाने मी राजकारणात इथपर्यंत आले. त्यामुळे त्यांची भूमिका ही चुकीची आहे असे मी म्हणणार नाही. परंतु, काही झाले तरी राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि नेते माझ्या पाठीशी आहेत आणि राहणार यात किंचितही संशय नाही.मतदारसंघाचा विचार करता या ठिकाणी अनेक समस्या आहेत. किंचितही विकास या ठिकाणी झालेला नाही. विकासाचा कोणत्याच मुद्दा आज विरोधकांकडे नाही. गावागावांमध्ये विविध समस्या असून त्या सोडवल्या गेल्या नाही हे सर्वच मुद्दे घेऊन मी जनतेपर्यंत पोहोचणार आहे. मला मिळालेले लिफाफा हे चिन्ह घराघरात पोहोचवणार आहे. कारण, माझा लिफाफा हा निश्चितच इतरांपेक्षा जड असणार आहे. त्यामध्ये सावंतवाडी मतदारसंघातील समस्या तसेच मतदारसंघाचे व्हिजन असणार आहे.
राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाच्यावतीने उमेदवारी मिळाली नसली तरी त्यांच्या विजयासाठी आम्ही अहोरात्र झटणार आहोत आज पक्षाचे वरिष्ठ नेते महाविकास आघाडीच्या माध्यमातून बाजू मांडत असताना अर्चना घारे यांनी घेतलेला हा निर्णय आम्हा कार्यकर्त्यांच्या हिताचा आणि भवितव्याचाच असून आम्ही त्यांच्या पाठीमागे ठाम राहणार आहोत अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. यावेळी पुंडलिक दळवी, देवा टेमकर, नंदू साटेलकर, ऋतिक परब आदी उपस्थित होते.