'मविआ'त दुमत ? ; सावंतवाडीत तुतारी की मशाल ?

Edited by: विनायक गांवस
Published on: October 03, 2024 12:07 PM
views 283  views

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून‌ अर्चना घारे-परब यांच नाव निश्चित करण्यात आलं आहे. जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी ही जागा इंडिया आघाडीतून तुतारी लढवणार असल्याचे स्पष्ट केले. तर दुसरीकडे उबाठा शिवसेनेकडूनही या मतदारसंघावर दावा कायम ठेवला आहे. आमच्याकडे पाच उमेदवार आहेत. इथला मतदार शिवसेनेसोबत असून आम्हालाच हा मतदारसंघ मिळेल असा पुनरुच्चार जिल्हाप्रमुख बाबुराव धुरींनी केला आहे‌. मविआच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेले दावे पूर्णतः चुकीचे आहेत असंही सांगितलं. त्यामुळे सावंतवाडीसाठी महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच पहायला मिळत आहे.

श.प. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले, सावंतवाडी मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा म्हणून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार प्रयत्नशील आहेत. हा मतदारसंघ आम्ही मिळवणारच आणि या मतदारसंघाच्या उमेदवार सौ. अर्चना घारे याच असतील. मुख्यमंत्री पदात पक्षाला रस नसल्याचे वरिष्ठांनी जाहीर केले आहे‌.‌ त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्यातील अन्य दोन मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांमागे आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत असे श्री. सामंत यांनी सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तर शिव स्वराज्य यात्रेच्या जाहीर सभेनंतर जागर जाणिव यात्रेचा समारोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

दरम्यान, उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी म्हणाले, महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून निवडणूका लढविल्या जात आहे.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाबाबत उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. हा मतदारसंघ शिवसेनेला मिळाला पाहिजे यासाठीची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. इथला मतदार शिवसेनेसोबत असून हा मतदारसंघ आम्हालाच मिळेल. महाविकास आघाडीचे काही प्रमुख पदाधिकारी या मतदारसंघावर दावा करत आहेत तो पूर्णतः चुकीचा आहे. आम्ही एकसंघ आहोत. वरिष्ठांचा निर्णय आम्हाला मान्य असेल. पण, मागचा दोन टर्म इथे शिवसेनेचा आमदार निवडून आल्याने त्याच पक्षाला उमेदवारी मिळावी ही आमची मागणी आहे, तसा फॉर्म्युला ठरला आहे. उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे ही भुमिका घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचे धन्यवाद. पण, सावंतवाडीच्या एका जागेवर कोण मुख्यमंत्री होणार हे ठरणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र ते ठरवणार आहे‌ असाही चिमटा श्री. धुरी यांनी काढला. 

एकंदरीत, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी श.प. व उबाठा शिवसेना सावंतवाडीसाठी आग्रही आहे‌. राष्ट्रवादीकडून अर्चना घारे-परब निश्चित असून उबाठाकडून रूपेश राऊळ, बाबुराव धुरी, बाळा गावडे, संदेश पारकर आदींच्या नावांची चर्चा आहे.‌ शेवटच्या क्षणाला आयात उमेदवार हाती मशाल घेण्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. कॉग्रेसकडून देखील यापूर्वी दावा केला गेला आहे‌. त्यामुळे इंडिया आघाडीकडून सावंतवाडी तुतारी वाजवली जाणार की मशाल पेटवीली जाणार ? हे अवघ्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे‌. त्यात उमेदवारीवरून दुमत झालेलं असताना स्थानिक पातळीवरील महाविकास आघाडी कायम राहते की दुभंगते ? हे देखील स्पष्ट होणार आहे‌.