पत्नीवर खूनी हल्ला प्रकरण ; पतीला 5 वर्षांची शिक्षा

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: March 06, 2025 11:14 AM
views 343  views

सिंधुदुर्गनगरी : 4 नोव्हेंबर 2018 ला रात्री 11.00 वा. गुन्हयातील पिडित महिला (आरोपीची पत्नी) ही तिचे दैनंदिन काम आटोपून अंथरुणावर झोपण्यासाठी गेलेली असताना आरोपी अशोक राजाराम शिंगरे, वय 62 रा. पराड, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग याने तिच्या चारित्र्यावर संशय घेवून भांडणतंटा करुन लोखंडी पाईपने मारहाण केली व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानुसार आरोपीचा मुलाने दिलेल्या तक्रारीवरुन मालवण पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

या गुन्हयाचा तपास मालवण पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी आवश्यक पुरावा गोळा करुन  न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले होते.

गुन्हयातील फिर्यादी, पिडित महिला ही आरोपीचा मुलगा व पत्नी होते. त्याचबरोबर खटल्यास अन्य प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हते. खटला परिस्थितीजन्य व वैदयकिय पुराव्यांवर शाबित करणे आवाहानात्मक होते. सदर खटल्याची सुनावणीअतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, वर्ग 1 श्रीमती सानिका जोशी,  यांच्या समोर होवून आरोपीस भा. दं. वि. कलम 307 अन्वये दोषी धरण्यात आले. त्यास  न्यायालयाने  5 वर्ष सश्रम कारावास, 5000 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिना कारावास अशी शिक्षा सुनावलेली आहे.

या खटल्याचे न्यायालयीन कामकाज अभियोग पक्षामार्फत अॅड  रुपेश देसाई, सरकारी अभियोक्ता, सिंधुदुर्ग यांनी पाहिले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी पैरवी अधिकारी पो.उ.नि./सुरज पाटील व मपोकों/अनुराधा कोळी यांनी खटला शाबीत होण्यासाठी आवश्यक ती मदत केलेली आहे.

 उत्कृष्ट अपराधसिद्धीसाठी  सौरभ कुमार अग्रवाल यांनी तपास अधिकारी, सरकारी अभियोक्ता व पैरवी अधिकारी यांचे अभिनंदन केलेले आहे.