सिंधुदुर्गनगरी : सख्ख्या भावाचा खून केल्या प्रकरणी प्रकाश तुकाराम गिरी गोसावी (वय ६०, रा- कुरंगवणे ता, कणकवली) याला सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली दोषी धरून जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती सानिका जोशी यांनी ७ वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी काम पाहिले. प्रकाश आणि संतोष हे दोन सख्खे भाऊ कुरंगवणे येथे वेगळ्या घरात राहत होते. दरम्यान मयत संतोष हे आपल्या भावाच्या घरी गेले होते. त्यावेळी प्रकाश याच्या मुलीने तयार करून ठेवलेले रात्रीचे जेवण संतोष याने संपवले होते. याचा राग आल्याने प्रकाश याने लोखंडी फुंकणीने संतोष यांच्या डोक्यावर प्रहार केला होता. यात संतोष यांचा मृत्यू झाला होता. ही घटना २१ एप्रिल २०२२ रोजी घडली होती. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी सादर केलेल्या दोषारोप पत्रानुसार चाललेल्या खटल्याच्या सुनावणीत सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली प्रकाश याला दोषी धरून शिक्षा ठोठावण्यात आली.