
कुडाळ : जसजशी टेक्नॉलॉजी सुधारते तसतसा त्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करणे गरजेचे आहे. अडचणींवर मात करून आपल्याला पुढे जायचे आहे.युग बदलते त्याप्रमाणे आपल्याला बदलणे गरजेचे आहे. व्हाट्सअपने आम्हाला मानवी चेहरा आणण्याची संधी दिली आहे.जेष्ठ नागरिकांसाठी ही हेल्पलाईन 365 दिवस कार्यरत असणार आहे. या चॅनलवरून तुम्हाला काही सूचना असतील त्या छोट्या-छोट्या संदेशद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. तुम्हाला उपयुक्त असलेली माहिती मिळणार आहे. जेष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. तीन महिन्यात तीन हजार जेष्ठ नागरिकांची पोलीसांनी विचारपूस केली आहे. जेष्ठ नागरिक व त्यांच्या नातेवाईकांनी हे चॅनल फॉलो केले आहे.आमच्यावर असलेले तुमचे प्रेम व या उपक्रमाची उपयोगिता आज आम्हाला जाणवत आहे.त्यामुळे जास्तीत-जास्त जेष्ठ नागरीकांनी हे व्हाटसप अँप चॅनल फॉलो करून निश्चितपणे उपयोग करून घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग पोलीस आधीक्षक मोहन दहीकर यांनी गुरुवारी सायंकाळी येथे केले.
महाराष्ट्र पोलीस दल वर्धापन दिना निमित्त सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांकरीता 'हाक आमची साथ तुमची' या टॅगलाईनखाली जेष्ठ नागरिक मेळावा व जेष्ठ नागरिकांकरीता संवादातून आधार-व्हाटसप अँप चॅनल लोकार्पण सोहळा येथील वासुदेवानंद सरस्वती सभागृहात आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा विधी सेवा व प्राधिकरण सचिव संपूर्णा दादोसो गुंडेवाडी, पद्मश्री परशुराम गंगावणे,ज्येष्ठ नागरिक संघटना जिल्हाध्यक्ष राजेश रेगे, सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, सिंधुदुर्ग पोलीस उपअधीक्षक श्वेता खाडे, सिंधुदुर्ग पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नलिनी शिंदे, कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सौ. मुल्ला, श्री. घोपडे, ज्येष्ठ नागरिक, पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने झाली. आधार-व्हाटसप अँप चॅनलचे लोकार्पण पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते करण्यात आले. सिंधुदुर्ग पोलीस आधीक्षक श्री. दहीकर यांचा कुडाळ पोलीस निरीक्षक श्री. मगदूम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.माड्याचीवाडी-रायवाडी येथील सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट (पिंगुळी ) संचलित जिव्हाळा सेवाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश बिर्जे,सविता आश्रम (पणदूर) संस्थापक संदीप परब, सीताराम संजीवनी आनंदाश्रम (निवती) च्या सानिका तुळसकर, आनंदाश्रम (अणाव) चे सर्व्हेसर्वा बबन परब, दिवीजा आश्रम (कणकवली-असनिया) संकेत शेटये, प्रसिद्ध युट्युबर लकी कांबळी, फिल्म प्रोड्युसर साईनाथ जळवी, विद्यार्थी भूपेंद्र परब व विद्यार्थीनी किशोरी विश्वनाथ कुरकुटे, डॉ. संजय केसरे, सौ. केसरे यांचा सत्कार करण्यात आला.
श्री. दहीकर म्हणाले, 2 जानेवारी 1960 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली. वर्धापन दिनानिमित्त आम्ही दरवर्षी वेगवेगळे उपक्रम घेतो.यावर्षी आम्ही जेष्ठ नागरिकांसाठा हा उपक्रम सुरु केला आहे. वयानुसार माणसाची चलबीचलपणा वाढते.आई-वडील व मुलांमध्ये आज दुरावा वाढत चालला आहे. त्यामुळे जेष्ठनागरीकांना त्याचा त्रास होतो.जेव्हा आपला मोबाईल हरवतो तेव्हा तुम्ही तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार केली पाहिजे. कारण त्याचा दुरुपयोग होणार नाही. आपली फसवणूक होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.मुद्देमाल हस्तांतरण हे आजचे नाही ते सातत्याने घडत असते. मात्र त्याची चर्चा सामान्य माणसांपर्यंत होत नाही. पोलीसांच्या कधीकधी काहीच हाती लागत नाही.कोणतीही मालमत्ता असो ही प्रत्येकाला योग्य वेळेत मिळणे आवश्यक असते. आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत. तुमच्यासाठी सदैव तत्पर आहोत.नवीन वर्षासाठी जेष्ठ नागरीकांनी शुभेच्छा दिल्या.
परशुराम गंगावणे म्हणाले, आजचा कार्यक्रम हा आगळावेगवेळा आहे. गेल्या वर्षी फक्त या कार्यक्रमाची सुरुवात होती. हे सर्वात यापूर्वीच व्हायला हवी होती. परंतु उशिरा का होईना सुरुवात झाली. गेल्यावर्षी फक्त ज्येष्ठ नागरिकांना हेल्पलाइन नंबर दिला होता. परंतु यावर्षीपासून व्हाट्सअप चॅनल सुरू करण्यात आला.त्याचे लोकार्पण माझ्या हस्ते झाले हे मी माझे भाग्य समजतो.खरोखरच मी आपला आभारी आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिला कळसूत्री बाहुल्यांचा संग्रहालय झाला. महाराष्ट्र शासनाने अलीकडेच या संग्रहालयाला पुरस्कार केला. त्यामध्ये पहिले नाव कोणाचे आले आपले नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आले. आजचे लोकार्पण हे तुमच्यासाठी महत्वाचे आहे. जेष्ठ नागरिकांसाठी जे काम आज आश्रम करतात ते काम त्यांच्या मुलांनी केले पाहिजे.सिंधुदुर्ग पोलीस हे तुमच्या सेवेसाठी उभे राहिले आहेत. पोलीस आता तुमचे मित्र झाले आहेत. तुम्हाला घाबरायची गरज नाही, असे त्यांनी सांगितले.
राजेश रेगे म्हणाले, अनेक लोक घाबरून पोलीसांकडे जात नाही. खेडोपाडी मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत आहेत.आज एकाकीने माणसे जीवन जगत आहेत. पोलीसांचे सहकार्य घेतल्यास अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकते. त्यासाठी विचारांची प्रगल्भता आपल्याकडे असली पाहिजे. आपण जेष्ठ असलो तरी प्रगल्भ आहोत. आपण आपल्या मुलाबाळावर कोणतेही निर्णय लादता कामा नये. पोलीस आपले मित्र आहेत अशा भावनेने वागलात तर अनेक गोष्टी साध्य होतील असे सांगून त्यांनी ज्येष्टाना शुभेच्छा दिल्या. संपूर्णा दादोसो गुंडेवाडी यांनी जेष्ठ नागरिक समस्या व कायदेविषयक मार्गदर्शन केले.प्रवीण कोल्हे यांनी डीजीटल अरेस्ट बाबत माहिती दिली. सखाराम सकपाळ व संदीप परब यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक नलिनी शिंदे यांनी तर सूत्रसंचालन अमर प्रभू यांनी केले.










