गोव्यातील महिलेचा दोडामार्गात खून | घोडगेवाडी भटवाडी पुलाजवळील घटना

खुनी पती व साथीदार पोलिसांनी केले गजाआड | 12 मे पर्यंत आरोपींना पोलिसांनी सुनावली कोठडी
Edited by: संदीप देसाई
Published on: May 10, 2023 19:05 PM
views 338  views

दोडामार्ग : तालुक्यात घोडेगेवाडी भटवाडी येथील कॉज वेच्या ठिकाणी महिलेच्या खुनाचा प्रकार आढळून आल्यानंतर दोडामार्ग पोलिसांनी दबंग कामगिरी बजावत या खुनाचा अवघ्या काही तासातच उलगडा केला. खून झालेली 30 वर्षीय महिला वास्को, गोव्यातील असून विशिता विनोद नाईक असे तिचे नाव आहे. पतीनेच मित्राच्या साहाय्याने गळा आवळून तिचा खून केल्याचे तपासात उघड झाले. दरम्यान, या खुनाच्या गुन्ह्यात संशयित म्हणून पती विनोद मनोहर नाईक (४० वर्षे, मूळ राहणार बेलबाय, वास्को व सध्या रा. पिंटो अपार्टमेंट, म्हापसा - गोवा) व त्याचा साथीदार ऋतुराज श्रावण इंगवले (४५ वर्षे, मूळ राहणार चंदगड, जिल्हा कोल्हापूर व सध्या राहणार चारवाडी म्हापसा ) या दोघांना अटक केली असून बुधवारी त्यांना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता 12 मे पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.




मिळालेल्या माहितीनुसार पत्नीने दुसऱ्याशी संबंध ठेवू नये, याबाबत वारंवार समजावून देखील पत्नी ऐकत नसल्याने पतीनेच रागाच्या भरात त्याच्या साथीदाराच्या मदतीने एका कारमध्ये ओढणीने पत्नीचा गळा आवळून विशिताचा खून केल्याचे समोर आले आहे. घोटगेवाडी भटवाडी येथील पुलाखाली तिचा मृतदेह टाकून मृत महिलेची ओळख पटू नये यासाठी आरोपींने तिचा चेहरा दगडाने ठेचून विद्रुप केला होता. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री  उघडकीस आला होता.


याबाबत अधिक माहिती अशी, घोटगेवाडी भटवाडी येथील कॉजवेच्या खाली अज्ञात महिलेचा चेहरा विद्रुप केलेला मृतदेह तेथील एका ग्रामस्थाला दिसला. त्यांनी याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो याना दिल्यावर त्यांनी पोलीस पाटील व पोलिसांना याबाबतची कल्पना दिली. लागलीच पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकुर, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंखे आदींनी घटनास्थळी दाखल होत मृतदेहाची पाहणी केली व तपासाची सूत्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली.


महिलेच्या पेहरावावरून सदरची महिला गोव्यातील असावी असा अंदाज व्यक्त करीत गोव्यातील पोलीस ठाण्यांमध्ये कोणी महिला बेपत्ता असल्याची तक्रार नोंद आहे का ? या दृष्टीने पोलीसांनी तपास सुरू केला. या तपासात म्हापसा पोलीस ठाण्यात विशिता विनोद नाईक ही महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या प्रियकराने नोंदवली असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार तिच्या प्रियकराला पोलीस ठाण्यात बोलावून घेत चौकशी केली असता पोलिसांनी केलेल्या वर्णनानुसार तो मृतदेह विशिताचाच असल्याचा अंदाज तिच्या प्रियकराने वर्तवित तिचा पती विनोद याच्यावर संशय व्यक्त केला.


लागलीच पोलिसांनी विनोद राहत असलेल्या ठिकाणी जाऊन त्याचीही चौकशी केली. त्यावेळी तो देत असलेली माहिती विसंगत असल्याचे आढळून आले. अखेर पोलिसी खाकीचा वचक दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. आपले सन २०१५ साली विशिताशी लग्न झाले. त्यांनतर दोन वर्षांनी आम्हाला मुलगी झाली. मात्र सन २०२० ला विशीताचे तिच्या माहेरच्या गावातीलच एका प्रियकराशी अनैतिक संबंध असल्याचे समजले. तिथपासून ती माझ्यापासून विभक्त राहत होती. दोघांच्याही घटस्फोटापर्यंत प्रकरण आले होते.सुरुवातीला विशीतानेच घटस्फोट मागितला होता मात्र नंतर तिने आपणास घटस्पोट नको असल्याचे न्यायालयात सांगितले होते. ती विभक्त राहत असली तरी ती मला भेटत असे यादरम्यान तिला तिचे प्रियकराशी असलेले संबंध कायमचे संपविण्याबाबत समज दिली मात्र ती ऐकत नसल्याने गोड बोलून तिला दोडामार्गमध्ये आणून नंतर घोटगेवाडी त नेऊन आपण आपल्या मित्राच्या मदतीने सोमवारी रात्री १ वा. च्या सुमारास विशीताचा गळा आवळून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानंतर या दोन्ही संशयित आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 12 मे पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पीआय ऋषिकेश अधिकारी, सहायक पोलिस निरीक्षक जयेश ठाकूर व त्यांचे सहकारी करत आहेत.


गोव्यातील महिलेचा चेहरा विद्रूप करत खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या घटनेचा तपास करणे सहज सोपे नव्हते, पण दोडामार्ग पोलीसांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गद्शनाखाली वेगवान सूत्रे हलवत अवघ्या काही तासात खून झालेल्या अनोळखी महिलेची ओळखच पटविली नाही तर यात सहभागी आरोपींना गजाआड करत त्याची पोलीस कस्टडीही मिळवली आहे.