
चिपळूण : शहरातील पेठमाप येथे एका घरात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलेल्या कुलसुम अन्सारी ( वय ५५ वर्षे) या महिलेचा खून झाल्याचे उघड झाले आहे.
तालुक्यातील पोफळी येथील कुलसुम अन्सारी ही महिला गेली काही वर्षे शहरातील पेठमाप मुकादम मोहल्ला येथील मन्सूर मुकादम यांच्या घरात भाडयाने राहत होती. घरगुती कामे करून ती आपल्या मुलासह कुटुंबाचा गाडा चालवत होती. त्यांचा मुलगा अरमान अन्सारी हा चांगला क्रिकेट खेळाडू असून सोमवारी क्रिकेट खेळण्यासाठी तो रत्नगिरीत गेला होता. त्यामुळे घरात ती एकटीच होती. तेथून त्याने फोनवर आईशी संपर्क साधण्याचा प्रय केला असता प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून त्याने आपल्या मित्रांना आपल्या घरी जाऊन आईची माहिती कळवण्याची विनंती केली. त्यानुसार त्याचे मित्र घरी पोहचले तेव्हा कुलसुम अन्सारी निपचित पडलेल्या अवस्थेत दिसून आल्या. तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त झालेले होते. त्यामुळे पोलिसांना याची कल्पना देण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी केली.
कोणत्यातरी ज्वालाग्रही पदार्थाने कुलसुम यांना जाळण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले. तेथेच काडयापेटीतील काडयादेखील पडलेल्या दिसून आल्या. कुलसुम यांच्या अंगावर ब्लॅंकेट टाकलेले होते. त्यांच्या शरीरावर काही संशयास्पद खुणादेखील दिसून येत होत्या. त्यामुळे पोलिसांचा खुनाचा संशय बळावला. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आणि तातडीने तपासाला सुरवात केली. रत्नगिरीतून श्वनपथकाला तसेच ठसेतज्ञालादेखील बोलावण्यात आले होते. सोमवारी सायंकाळपर्यंत पोलिस पथक तपास करत होते. कुलसुम यांचा मुलगा रत्नागिरी येथून आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडूनही माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
गेल्या काही वर्षांपासून कुलसुम अन्सारी पेठमाप येथे वास्तव्यास होत्या. ही दुर्घटना उघड होण्यापूर्वी काही जणांनी त्यांना घरातून मारहाण करत बाहेर काढल्याचे पाहिले होते. मारहाणीनंतर पुन्हा त्यांना घरात नेण्यात आल्याची चर्चा घटनास्थळी होती. त्यामुळे त्यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत असून पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे.