मुणगे आडबंदर ग्रामस्थ करणार साखळी उपोषण...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 29, 2024 13:59 PM
views 277  views

देवगड : मुणगे आडबंदर येथील ग्रामस्थ ३१ जानेवारी रोजी साखळी उपोषण करणार आहेत याबाबतची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे, या पत्रकात म्हटले आहे की मुणगे ग्रामपंचायत कडून आडबंर येथे होणारा पाणी पुरवठा गेले ७ महिने बंद आहे व जुनी पाईप लाईन नादुरुस्त आहे.

जलजीवन मिशन योजनेतून मुणगे - आडबंदरसाठी मंजूर झालेल्या कामाचा कार्यारंभ दिनांक ०८/०२/२०२३ ला प्रस्तावित होता व काम पूर्ण करण्याचा कालावधी दिनांक २८/०२/२०२४ होता. पण अद्याप काम सुरु झालेले नाही. तीन वर्षापूर्वी मुणगे आडबंदर नळयोजनेवर ९४ लाख रुपये खर्च झाले, पण पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही. गावकऱ्यांनी मागणी करूनही त्याची चौकशी झाली नाही.

याबाबत शासन दरबारी पत्रव्यवहार देखील करण्यात आले. आमचे आंदोलन वरील गोष्टीना जबाबदार असलेल्या व्यवस्थापणाच्या विरोधात आहे. जलजीवन मिशनचे काम सुरु होऊन कधी पूर्ण होणार याचे ठोस उत्तर मिळाल्याबर हे साखळी उपोषण आंदोलन मागे घेण्यात येईल. असा इशारा मुणगे आडबंदर ग्रामस्थांनी दिला आहे, मुणगे ग्रामपंचायत नजीक परिसरात हे साखळी उपोषण ३१ जानेवारी रोजी होणार आहे.