मुंढे तर्फे सावर्डे ग्रा.पं. नूतन इमारतीचं उद्घाटन

Edited by: मनोज पवार
Published on: May 20, 2025 13:09 PM
views 103  views

चिपळूण : मुंढे तर्फे सावर्डे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेला ग्रामपंचायत नूतन इमारत उद्घाटन समारंभ दिमाखदार वातावरणात आणि उत्साही उपस्थितीत आमदार शेखर निकम यांच्या हस्ते संपन्न झाला.  या  गावच्या विकासाच्या दिशेने उचललेले हे पाऊल गावकऱ्यांच्या मनात नव्या आशा पल्लवित करणारे ठरले.

कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये दत्ताशेठ गुजर, महेंद्र सुर्वे, योगेश मोरे, विजय भुवड, प्रमोद डिके, संजय कदम, रविंद्र साळुंखे, सचिन मोरे, दिलीप मोरे, रामचंद्र चव्हाण, साक्षी साळुंखे, लक्ष्मण येडगे, मनिषा मोरे, अनन्या चव्हाण, मानसी काणेकर, स्वाती कांबळे, रणवीर मोरे, संतोष निकम तसेच ज्येष्ठ जमीनदार शांताराम चव्हाण यांचा प्रमुख सहभाग होता.

या प्रसंगी बोलताना आमदार शेखर निकम यांनी ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक करत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत पाठबळ देण्याचे आश्वासन दिले. "ग्रामविकास हा केवळ योजनांवर नाही, तर लोकांच्या सहभागावर आणि एकजुटीवर अवलंबून असतो,"असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत सुयोग्य रितीने करण्यात आले होते. उपस्थित ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गावकऱ्यांनी व्यक्त केलेल्या समाधानामुळे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेचे प्रत्यक्ष दर्शन घडले.