
मुंबई : “आमचा हायवेच पुरा ब्लॅक स्पॉट आहे!” अशा स्पष्ट आणि ठाम शब्दांत आमदार शेखर निकम यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामांबाबत विधानसभेत आवाज उठवला. पावसाळी अधिवेशनात त्यांनी या महामार्गामुळे कोकणवासीयांना भेडसावणाऱ्या समस्या अधोरेखित करत सरकारच्या लक्षात आणून दिल्या. शेखर निकम यांनी सांगितले की, महामार्गावर ठिकठिकाणी सुरू असलेल्या अर्धवट कामांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, संपूर्ण मार्गच नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणारा 'ब्लॅक स्पॉट' झाला आहे. बुद्धवाडीसारख्या ठिकाणी अंडरपासच्या अभावामुळे निर्माण झालेली आंदोलनेही त्यांनी अधिवेशनात मांडली.
"आदरणीय मंत्री महोदय, आपण स्वतः महामार्गावर गाडीतून फिरून काही ब्लॅक स्पॉट पाहिले आहेत. पण आमचा हा संपूर्ण मार्गच एक अखंड ब्लॅक स्पॉट आहे," असे ठामपणे सांगत, त्यांनी हा प्रश्न केवळ स्थानिक नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेचा असल्याचे स्पष्ट केले.
यावर उत्तर देताना मंत्री महोदयांनी सकारात्मकता दर्शवत निकम यांच्या भूमिकेला मान्यता दिली. त्यांनी सांगितले की, "शेखर निकम यांचं म्हणणं अत्यंत योग्य असून, या संदर्भात लवकरच सर्व संबंधित आमदारांची बैठक घेण्यात येईल. या बैठकीचे पत्रक केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना सादर करण्यात येईल. संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग आवश्यक असून त्याअनुषंगाने पुढची दिशा ठरवली जाईल."
शेखर निकम यांच्या या ठाम भूमिकेमुळे कोकणवासीयांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारचे लक्ष केंद्रीत झाले असून, महामार्गाच्या कामास नव्याने चालना मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.