चिपी विमानतळावर मुंबई विमान रद्द ! खराब हवामानाचे कारण

कँटीनही नसल्याने प्रवाशांचे झाले हाल
Edited by: उमेश बुचडे
Published on: September 12, 2022 15:26 PM
views 217  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून मुंबईला जाणारे बुधवार दि. ३१ ऑगस्ट, २०२२ रोजी सायंकाळी ४.०० वाजताचे विमान खराब हवामान असल्याचे कारण सांगून अचानक रद्द करण्यात आले. या विमानाने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. याबाबत खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक यांनी विमान सेवेच्या गलथान कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

चिपी विमानतळावरून मुंबईला जाणारे विमान अचानक रद्द करण्यात आल्याने जेष्ठ नागरिक, महिला तसेच लहान मुलांना खाण्यापिण्यासाठी वणवण करावी लागली. या विमानतळावर कॅन्टीन नसल्यामुळे सर्वच प्रवाशांचे मोठे हाल झाले. काही प्रवासी दुपारी दोन वाजल्यापासून एअरपोर्टवर येऊन थांबले होते. तर या एअरपोर्टवर साधी कॅन्टीनची देखील व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे खाण्यापिण्याचे हाल तर झालेच. परंतु दर दहा मिनिटांनी ‘दहा मिनिटे थांबा’ असे वेटिंगवर ठेऊन सायंकाळी साडेसहा वाजता फ्लाईट रद्द झाले असल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. अचानक विमान रद्द झाल्याचे समजताच लांबून आलेल्या प्रवाशांना माघारी जावे लागले. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.


या विमानामध्ये खारेपाटण, तरेळे, वैभववाडी, सावंतवाडी, मालवण या सर्व तालुक्यातील प्रवासी प्रवास करणार होते. पण त्यांनी या विमान प्रवाहाच्या सेवेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर तरी किमान सिंधुदुर्ग जिह्यातील चिपी विमानतळावर प्रवाशांसाठी अत्यावश्यक सुविधा प्रशासनाने पुरविल्या पाहिजे होत्या. मात्र सध्या इथे कोणत्याही सोयी सुविधा नसल्याने हवाई सफर करणाऱ्या प्रवाशांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर इमर्जन्सी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ताटकळत ठेऊन अचानक फ्लाईट रद्द झाल्याचे सांगण्यात येऊन प्रवासी वर्गाला नाहक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. तरी कोकणात आलेल्या गणेशभक्तांना विनंती आहे की, हवामानाचा अंदाज घेऊनच विमानाची तिकीटे बुक करावी. तर प्रशासनाने हवाई प्राधिकरणाने आपल्या गलथान कारभारात सुधारणा करावी, अशी मागणी खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक यांनी केली आहे.