मल्टिस्पेशालिटीला माजगावची शासकीय जागा घ्यावी ; ग्रामस्थांची मागणी

युवराज लखम राजेंची घेतली भेट
Edited by: विनायक गांवस
Published on: January 21, 2023 23:18 PM
views 136  views

सावंतवाडी : जागेच्या वादात तब्बल ५ वर्ष रखडलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी वेत्ये, मळेवाडा, शहरातील तीन आरक्षित जागा, माडखोल येथील जागांनंतर आता शहराच्या सीमेवरच गाव असणाऱ्या माजगावनं देखील मल्टीस्पेशालिटीला लागणारी जागा उदयमनगर येथील दहा एकर शासकीय जागेतून घ्यावी अशी मागणी केली आहे. त्याच ठिकाणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात यावं व त्यासाठी राजघराण्यानेही होकार दर्शवावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत व माजगावच्या सरपंचा डॉ. अर्चना सावंत यांनी सावंतवाडी संस्थानचे युवराज तथा भाजपाचे युवा नेते लखमराजे सावंत-भोंसले यांच्याकडे केली. 


युवराज लखमराजे भोंसले यांनी माजगाव ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी त्यांचा माजगाव ग्रामपंचायतीच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मल्टीस्पेशालिटीबाबतची मागणी करण्यात आली. सावंतवाडीत जागेमुळे रखडलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी माजगाव येथे असलेली दहा एकर शासकीय जागा आम्ही देण्यास तयार आहोत. सद्यस्थिती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. त्यासाठी आवश्यक असलेला पाठपुरावा शासनस्तरावर करण्यात यावा यासाठी आवश्यक असलेले सहकार्य आम्ही करू अशी ग्वाही रेश्मा सावंत, अर्चना सावंत यांनी दिली. तर माजगावात हे हॉस्पिटल झाल्यास त्याचा फायदा परिसराला होणार आहे. ही जागा जुन्या मुंबई-गोवा महामार्गाला लागून असल्यामुळे त्या ठिकाणी कोणतीही समस्या जाणवणार नाही. उप जिल्हा रूग्णालयाला देखील नजीक असणारी ही जागा आहे. त्यामुळे या जागेचा विचार करण्यात यावा असं मत व्यक्त केले. यावेळी युवराज लखमराजे सावंत-भोंसले, पोलिस उपनिरिक्षक अमित गोते, पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एस. व्ही. ठाकुर, उपसरपंच बाळा वेजरे, माजी पंचायत समिती सदस्य बाबू सावंत, अ‍ॅड. शाम सावंत, भाजप किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अजय सावंत, देविदास बोर्डे, संजय कानसे आदी उपस्थित होते.