आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सुनील तटकरेंनी धरलं धारेवर

Edited by: मनोज पवार
Published on: January 23, 2025 18:56 PM
views 324  views

मंडणगड : केंद्र व राज्य शासनाच्या योजना व दोघांच्याही समन्वयाच्या योजना अधिक गतमिन पध्दतीने राबवण्यासाठी व महाराष्ट्राला विकास वाटेवर अधिक गतिमान करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आगामी काळात अधिक गतिमान पध्दतीने काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी मंडणगड पंचायत समितीचे 23 जानेवारी 2025 ला आयोजीत आढावा सभेत केले. 

यावेळी त्यांनी एस.टी., महावितरण, सार्वजनिक बांधकाम, पंचायत समिती बांधकाम विभाग, बीएसएनएल आदी खात्यांचा आढावा घेतला व या खात्याशी संबंधीत नागरिकांच्या विविध समस्या ऐकून घेतल्या. आढावा बैठीकीस निर्णयक्षम अधिकारी वर्ग उपस्थित नसल्याने या बद्दल जाहीर नाराजी व्यक्त करताना अधिकारी वर्गाने आपल्या संवेदना जागरुक ठेवून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची गरज व्यक्त केली. सर्व खात्यांना पुढील एक महिन्यांचा कार्यक्रम आखून देताना आपण या संदर्भात स्वतः पाठपुरावा करुन आपणास दिलेल्या कामाचे अवलोकन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

यावेळी तालुक्यातील हर घर जल या जलजीवन योजनेसंदर्भात पाणी पुरवठा विभागाने घोषित केलेल्या गावांमधील योजनेची गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पंधरा दिवसात तलाठी, ग्रामसेवक यांनी पाहणी करून 15 दिवसात आवहाल सादर करण्याचे निर्देश यावेळी खासदारांनी दिले. जिल्हा वाहतूक नियंत्रक, दुरसंचार कंपनी वरिष्ठ अभियंता रत्नागिरी इत्यादी खात्याचे अधिकाऱ्यांना धारेवर धरताना मंडणगड तालुक्यास भेट देऊन प्रत्यक्ष जागेवर अहवाल करण्याचे आदेश दिले.

यावेळी दापोलीच्या प्रातांधिकारी अर्चना बोंबे, तहसिलदार अक्षय ढाकणे, पोलिस निरीक्षक नितीन गवारे, गटविकास अधिकारी विशाल जाधव, मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश वास्ते, जिल्हा परिषद बांधकामाचे अभियंता देवकीनंदन सकपाळे, यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी व तालुक्यातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.