LIVE UPDATES

पदाचा कधीही गर्व नको

खासदार नारायण राणेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 24, 2026 21:17 PM
views 28  views

मालवण आपल्यासाठी नेहमीच 'शुभ'

मालवण : राजकारणात तब्बल ६० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असताना आणि मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांसारखी सर्वोच्च पदे भूषवूनही मी स्वतःला नेहमीच एक सर्वसामान्य कार्यकर्ता आणि जनतेचा सेवक मानत आलो आहे. पदाचा कधीही गर्व न बाळगता सातत्याने लोकांची सेवा करत राहा, जनतेचे प्रेम नक्कीच मिळेल," असा मोलाचा सल्ला माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना दिला. मालवण हा आपल्यासाठी नेहमीच 'शुभ' मतदारसंघ राहिला असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

मालवण भाजप कार्यालय आणि महायुतीच्या कार्यालयास खासदार नारायण राणे सदिच्छा भेट दिली. महायुतीच्या कार्यालयात नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी श्री. राणे यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, मेघा सावंत, भाग्यश्री मयेकर, उमेश नेरुरकर, राजू बिडये यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. भाजप कार्यालयात तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, महेश मांजरेकर, राजू परुळेकर, विलास हडकर, पंकज सादये, महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, महिमा मयेकर, महानंदा खानोलकर, क्षमा हडकर, दर्शना कासवकर, मिलिंद कुलकर्णी, अमृता फाटक, अशोक तोडणकर, उपसभापती घनश्याम झाड यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

आपल्या राजकीय प्रवासातील अनुभव सांगत कार्यकर्त्यांना लोकसेवेचा वसा चालू ठेवण्याचे आवाहन केले. मालवणात आल्यावर मला प्रेरणा, ऊर्जा, प्रोत्साहन मिळते अशी माझी भावना आहे. या भावनेतून मी आज सदिच्छा भेट दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास व्हावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. यादृष्टीनेच मी राजकारणात सक्रिय राहिलो आहे. माझे राजकारणातील हे दहावे पद आहे. आमदार झालो, सभागृहात गेलो, अनेक मोठी पदे मिळाली, पण मी नेहमी सरळ आणि साध्या मार्गाने चालत राहिलो. लोकांची मदत करणे आणि सहकार्य करणे हीच माझी कार्यपद्धती असून, माझ्या डिक्शनरीत 'नाही' हा शब्दच नाही.

कार्यकर्त्यांना अभ्यासाचे महत्त्व पटवून देताना राणे यांनी आमदार निलेश राणे यांचे कौतुक केले. निलेश राणे आज ज्या पद्धतीने काम करत आहेत, ते सर्वांसमोर आहे. मागच्या अधिवेशनात त्यांनी केलेली भाषणे बघा. अभ्यास केला की आपल्याला कामाची दिशा मिळते आणि माणुसकी प्राप्त होते.  कार्यकर्त्यांनीही संयम आणि अभ्यासू वृत्ती अंगी बाळगली पाहिजे, असे राणे म्हणाले.

पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी येत्या काळात आमदार, खासदार, नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन मार्गदर्शन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही कधीही हाक मारा, तुमच्या मदतीला मी तत्पर असेन, अशी ग्वाही देत खासदार राणे यांनी कार्यकर्त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.