LIVE UPDATES

सांजावचा उत्साह

मिलाग्रीस कॅथेड्रलसह सावंतवाडी तालुक्यात सेलिब्रेशन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 24, 2026 21:34 PM
views 23  views

सावंतवाडी : मान्सूनच्या सुरुवातीला २४ जून रोजी साजरा होणारा ख्रिश्चन बांधवांचा उत्साहाचा सण म्हणजे 'सांजाव" ख्रिश्चन बांधवांचा हा सांजाव सावंतवाडीतील मिलाग्रीस कॅथेड्रलसह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवात मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव आणि युवाई सहभागी झाली होती. सकाळपासून पावसानं देखिल जोर धरल्याने सांजाव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


संत जॉन बाप्तिस्ता यांचा जन्मदिवस सांजाव म्हणून साजरा केला जातो. संत जॉन यांच्या नावाचा अपभ्रंश होऊन 'सांजाव' शब्द बनला आहे. हा सांजाव सण गोव्यासह कोकणात देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक सांजाव उत्सवाची धूम या निमित्ताने पाहायला मिळाली. बायबलमधील कथेनुसार जीजसच्या जन्माची बातमी ऐकल्यानंतर आपल्या आईच्या पोटात असलेल्या जॉन बाप्तिस्त यांनी आनंदाने उडी मारली होती. जॉ बायबलच्या कहाणी नुसार देवाची आई 'मेरी'ने आपली बहीण एलिजाबेथला आपल्याला जीजस नावाचा बाळ होणार असल्याचे सांगितले. तेव्हा एलिजाबेथ गर्भवती होती आणि ते ऐकल्यावर तिच्या पोटातील बाप्तिस्त यांनी आनंदाने उडी मारली होती. तेव्हापासून हा सण साजरा केला जात असल्याचे बोलले जाते. ख्रिस्ती लोक विहिरीला एलिझाबेथच्या गर्भाशयाचे प्रतीक मानत असून विहिरीत उडी मारणे म्हणजे ख्रिस्ताचा जन्माचा आनंद साजरा करण्यासारखे मानतात. बुधवारी धो-धो पडणाऱ्या पावसामध्ये डोक्यावर रंगीत फुलांचे मुकुट घालून अर्थात कॉपेल हातामध्ये माडाच्या झाडाच्या फांद्या आणि वाद्यांचा गजर करीत ख्रिस्ती बांधव हा सण साजरा करतात. मौज मस्ती करत कोकणी गाणी गात, घुमट वाद्य वाजवत सर्वजण आनंदाने नाचतात. विहिरीमध्ये डुबकी मारण्याची चढाओढ त्या सोबतच सजवलेल्या होड्यांची स्पर्धा आणि संगीत नृत्याचा कार्यक्रम देखील यावेळी पाहायला मिळाला. सावंतवाडीतील मिलाग्रीस कॅथेड्रल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले होते.


दरम्यान, मिलाग्रीस कॅथेड्रल येथे  बिशप अग्नेलो पिन्हेरो यांच्या हस्ते जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी फादर मिलेट, फादर गाब्रियल, फादर अमृत, फादर ऑल्विन गोन्सालवीस, पेरिश कँथरिल मेंबर्स, ग्रेगरी डान्टस, जिल्हा बँक संचालक रवी मडगावकर, व्हिक्टर डान्टस आदी उपस्थित होते.