
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासकामांची संपूर्ण माहिती घेऊन, ती कामे जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून प्राधान्याने पूर्ण केली जातील, अशी ग्वाही खासदार नारायण राणे यांनी दिली. कुडाळ येथील महायुती कार्यालयाला खासदार नारायण राणे व नीलम राणे यांनी सदिच्छा भेट दिली, त्याप्रसंगी ते बोलत होते. या भेटीदरम्यान त्यांनी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी कार्यालयात कुडाळ तालुक्यातील महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात खासदार नारायण राणे यांनी जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला. तसेच आमदार निलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या लोकप्रतिनिधी म्हणून असलेल्या धडाडीच्या कार्यपद्धतीचे आणि त्यांनी केलेल्या विकासकामांचे जाहीर कौतुक केले. जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने करण्यासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
या दौऱ्याचे औचित्य साधून उपस्थित महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या प्रभागातील, गावातील प्रलंबित विकासकामे आणि स्थानिक समस्यांबाबतची निवेदने खासदार नारायण राणे यांच्याकडे सुपूर्द केली.
कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत, "तुम्ही दिलेल्या सर्व निवेदनांचा सखोल अभ्यास करून, त्या सर्व स्थानिक कामांना नक्कीच न्याय दिला जाईल," असा विश्वास खासदारांनी कार्यकर्त्यांना दिला. या सदिच्छा भेटीमुळे कुडाळ तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. या कार्यक्रमाला महायुतीचे प्रमुख नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











