
कुडाळ : छत्रपती शिवाजी महाराज की जय,एक मराठा लाख मराठा,आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अशा घोषणांनी मुंबई गोवा महामार्ग दणाणून सोडत वेताळबांबर्डे सकल मराठा समाजाच्या वतीने महामार्गावर तेलीवाडी येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले आहे. आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण छेडले आहे, या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून वेताळ बांबर्डे सकल मराठा समाजाच्या वतीने आज मुंबई गोवा महामार्गावर तेलीवाडी येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले आहे.
जरांगे पाटील यांनी छेडलेल्या उपोषणाला आमचा पाठिंबा आहे. हा शेवटचा पर्याय आहे, शासनाने मराठ्यांच्या भावना समजून घेत तातडीने आरक्षण मंजूर करावं, अशी मागणी यावेळी माध्यमांशी बोलताना मराठा बांधव आनंद भोगले यांनी केली. यावेळी मराठा बांधव प्रसाद गावडे बोलताना म्हणाले की, मराठ्यांचा अंत पाहू नका, मराठा शांत आहे तोपर्यंत आरक्षण मंजूर करा, मराठ्यांनी याआधी 57 ते 58 मराठा मोर्चा काढले, 50 मराठ्यांनी आतापर्यंत स्वतःचं आयुष्य संपवलं. वेळीच विचार करा आरक्षण आमच्या हक्काचा आहे. मराठा बांधवांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असा इशाराच मराठा बांधव प्रसाद गावडे यांनी दिला. वेताळ बांबर्डे सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवशीय लाक्षणिक उपोषणाला गावातील महिला मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत, तर शाळकरी मुलींची मुलांची उपस्थिती लक्षणीय ठरली.