
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध वाढीसाठी जिल्हा बँक, जिल्हा परिषद, गोकुळ दूध संघ व भगीरथ प्रतिष्ठान यांच्यामध्ये आज सामंजस्य करार झाला. सिंधुदुर्ग जिल्हा धवल क्रांतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठीचे प्रयत्न सर्वच स्तरावरून सध्या सुरू आहेत .एकेकाळी दुधाची वाणवा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या प्रतिदिन तीस हजार लिटर दूध संकलन होत आहे. येत्या चार वर्षात एक लाख लिटर दूध उत्पादनाचे लक्ष जिल्ह्यात ठेवण्यात आलेले आहे. याच अनुषंगाने प्रयत्न सर्व दिशेने आणि सर्व स्तरावरून सुरू आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक,सिंधुदुर्ग जिल्हा परिषद,गोकुळ दूध आणि भगीरथ प्रतिष्ठान यांच्यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धन विषयक गोठा बांधणी, कृत्रीम रेतन सेवा योजना राबविणे आणि बायोगँस संदर्भात, महत्त्वपूर्ण असे तीन सामंजस्य करार करण्यात आले . सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर, गोकुळचे अधिकारी डॉ. नितीन रेडकर, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे सामंजस्य करार करण्यात आले.