
नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसलेंची माहिती
सावंतवाडी : सुमारे १५० वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल सावंतवाडीच 'हृदय' मोती तलावाचा कायापालट होणार असून त्याला नवसंजीवनी मिळणार आहे. हे होत असताना तलावाचा ऐतिहासिक लूक देखील परिसराला देण्यात येणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व युवराज लखमराजे भोंसले यांनी दिली. या विकास आराखड्याचे सादरीकरण मंत्री नितेश राणे यांच्या समोर करण्यात आल्यानंतर आज त्यांनी सावंतवाडीत पत्रकारांशी संवाद साधला.
नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले म्हणाल्या, महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या प्रोजेक्टच सादरीकरण करण्यात आले. ऐतिहासिक तलावाला नवसंजीवनी देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. तलाव परिसरातील भिंतींच संरक्षण व पाणी गढूळ होऊ नये यासाठी फिल्टर प्लांट बसविण्यात येणार आहे. यामुळे केवळ पाणी तलावात जाणार असून माती आतमध्ये जाणार नाही अशी माहिती त्यांनी दिली. तसेच तलावाच्या खाऊ गल्लीसाठीच्या आरक्षीत भागात वाढ करून फुड प्लाझा व बोटिंग प्रोजेक्ट उभारला जाणार आहे. फेस्टीवल मार्केटसाठी वेगळी जागा ठेवली जाणार आहे. हॅण्ड क्राफ्टसह कलावंतांसाठी एक जागा निश्चित केली आहे. गणेश विसर्जनाचा भाग देखील 'व्हिव पॉईंट' म्हणून विकसित होणार आहे. स्थानिक कला प्रकारांसाठी ओपन एम्पीथिएटर उभारण्याची संकल्पना राजवाडा समोरील भागात मांडण्यात आली आहे. तर, ऐतिहासिक टच असलेल्या बैठका, लहान मुलांना आकर्षित करणारी बैठक व्यवस्था, ज्येष्ठ, महिलांसाठी बसण्याची सोय आदी धर्तीवर नियोजन करण्यात आले आहे.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व तलावाच्या दिशेने बघत काठावर बसण्याची सोय व्हावी अशा प्रकारे बैठक व्यवस्था होणार आहे. रतन जे. बटलिबोई कन्सल्टंट्स प्रा. लि. आणि ईडन एलएलपी यांच्या सहकार्याने हा दूरदृष्टी आराखडा तयार करण्यात आला आहे. माझ्या कारकिर्दीत हा प्रकल्प साकारण्याचा मानस आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तर, ऐतिहासिक वारसा लाभलेल हे तलाव सावंतवाडीची शान आहे. ३१ एकर मध्ये ते वसल असून त्याला अधिक आकर्षित करून शहराबाहेरून जाणारा पर्यटक शहराकडे कसा वळेल यासाठी आपला पुढाकार राहणार आहे. सावंतवाडीची शान असलेल्या मोती तलावाला ग्लोबल स्तरावर ओळख मिळावी यादृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण असून जास्तीत जास्त निधी यासाठी मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं मत युवराज लखमराजे भोंसले युवराज दिले.










