LIVE UPDATES

पोलीस पाटील जीतेंद्र राणे निलंबित

Edited by: स्वप्नील लोके
Published on: May 28, 2026 20:52 PM
views 47  views

देवगड : देवगड तालुक्यातील मोंड येथील पोलीस पाटील जीतेंद्र सुधाकर राणे यांच्याविरुद्ध विविध फौजदारी गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचे स्वरुप सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था, धमकी, मारहाण, बेकायदेशीर जमाव, शासकीय कामात अडथळा इत्यादी बाबींशी संबंधित असल्याने कणकवली उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी जगदीश कातकर यांनी जीतेंद्र राणे यांना मोंड गावच्या पोलीस पाटील पदावरून निलंबित केले आहे. अभिलेखावरील पोलीस अहवाल, पडताळणी नोंदी, गुन्हे तपशील व पत्र व्यवहार यांच्या परीक्षणावरून ही कारवाई करण्यात आली आहे.


पोलीस पाटील हा गाव पातळीवरील शासनाचा प्रतिनिधी असून ग्रामस्तरावर कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, शासकीय यंत्रणेस माहिती देणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे इत्यादी महत्वाची कर्तव्ये पार पाडतो. पोलीस पाटील हा गावातील शांतता राखणारा व पोलीस प्रशासनाशी समन्वय ठेवणारा पदाधिकारी असल्यामुळे त्याच्याकडून कायद्याबद्दल आदर, शिस्तबद्ध वर्तन, निष्कलंक चारित्र्य व सार्वजनिक विश्वासास पात्र अशी प्रतिमा अपेक्षित असते. अशा पदावरील व्यक्तीविरुद्ध गंभीर फौजदारी गुन्हे नोंद असणे ही बाब प्रशासनिकदृष्ट्या अत्यंत गंभीर स्वरुपाची मानली जाते. जीतेंद्र राणे हे ग्राम पोलीस पाटील या सार्वजनिक जबाबदारीच्या पदावर कार्यरत असूनदेखील त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे त्यांच्या पदावरील राहण्यामुळे सार्वजनिक हितास बाधा पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. अभिलेखावरील पोलीस तसेच तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी - देवगड यांचे अहवाल, पडताळणी नोंदी, गुन्हे तपशील व पत्र व्यवहार यांचे परीक्षण उपविभागीय दंडाधिकारी यांनी करून जीतेंद्र राणे याच्याविरुद्ध विविध स्वरुपाचे फौजदारी गुन्हे असल्याचे निदर्शनास आले.

सदर गुन्हे केवळ तांत्रिक किंवा किरकोळ स्वरुपाचे नसून सार्वजनिक सुव्यवस्था, धमकी, जमावबंदी उल्लंघन, शासकीय कामात हस्तक्षेप व इतर गंभीर बाबींशी संबंधित असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. पोलीस विभागानेदेखील जीतेंद्र राणे यांचे वर्तन हे पोलीस पाटील पदाच्या स्वरुपाशी विसंगत असल्याचे अभिलेखात नमूद करण्यात आले आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कार्यवाही झालेली अभिलेखावरून दिसून येत आहे. त्यामुळे ते या पदावर कायम राहिल्यास साक्षीदारांवर प्रभाव पडण्याची शक्यता, ग्रामस्तरावरील प - शासनावर दबाव निर्माण होण्याची शक्यता, चौकशी प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता, जनतेचा प्रशासनावरील विश्वास कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सर्व अभिलेख, पोलीस अहवाल, पडताळणी कागदपत्रे, जबाबदाराविरुद्ध नोंद गुन्हे, प - तिबंधात्मक कार्यवाही, पोलीस विभागाची शिफारस, कार्यकारी दंडाधिकारी यांचा अहवाल, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९६७ मधील कलम ११ मधील तरतुदी तसेच न्यायालयीन तत्वे यांचा एकत्रित विचार करता जीतेंद्र राणे हे पोलीस पाटील पदावर राहणे सार्वजनिक हितास बाधक ठरू शकते. त्यामुळे कणकवली उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी जगदीश कातकर यांनी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १९६७ च्या कलम ११ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मोंड पोलीस पाटील जीतेंद्र राणे यांना पुढील आदेश होईपर्यंत त्यांच्या पदावरून निलंबित केले आहे.