
सरपंच पराग गावकरांचं स्पष्टीकरण
दोडामार्ग : गेल्या दोन वर्षापासून आडाळी एमआयडीसीत सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी आम्ही करत आहोत. वेळीच त्याची कार्यवाही झाली असती तर आता एमआयडीसी क्षेत्राची होणारी बदनामी टळली असती. लालफितीच्या कारभारात अडकलेल्या सुरक्षारक्षक नियुक्तीची फाईल मंजूर झाली तरी येथील अवैध प्रकार थांबतील. त्यामुळे तात्काळ कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नियुक्ती करावेत अशी मागणी आडाळी सरपंच पराग गांवकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली.
आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास कृती समितीचे अध्यक्ष पराग गावकर व सचिव प्रवीण गावकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले की औद्योगिक क्षेत्रात सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी आम्ही गेल्या वर्षभरापासून करत आहोत. मात्र ही कार्यवाही लालफितीच्या कारभारात अडकून पडल्याने येथील सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आज येथील कोट्यावधीची मालमत्ता धोक्यात आहे. आडाळी औद्योगिक क्षेत्रात महामंडळाच्या पाणी पुरवठा, 33 केव्ही वीज उपकेंद्र आदि कामे पूर्ण झाली आहेत. या सुविधासाठी महामंडळाने कोट्यावधीचा खर्च केला आहे. मात्र येथील यंत्रणाच्या सुरक्षिततेसाठी महामंडळकडून कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. गेल्यावर्षी येथील उपकेंद्रत वीजवाहिनीच्या कामासाठी आणलेल्या लाखो रुपये किमतीच्या तारेची चोरी झाली. त्यावेळेस येथील सुरक्षितत्ते चा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर गेल्या वर्षी रात्रीच्या वेळी खनिजसदृश्य मातीचे अवैध उतखनन करून भूखंडचे नुकसान केले.त्यावेळेस महसूल व महामंडळ प्रशासनाकडे तक्रारी केल्या. मात्र दोन्हीकडून त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आला नाही. त्यानंतर उद्योजकांचे भूखंड, महामंडळची मालमत्ता यांची सुरक्षितात लक्षात घेऊन व अवैध खनिजसदृश्य माती वाहतूक याला आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमण्याची लेखी मागणी केली.
गेल्या वर्षभरात त्याबाबत अधिकाऱ्यांना भेटून विनंती केली. मात्र सुरक्षारक्षक नेमण्याच्या प्रस्तावाला महामंडळच्या मुख्य कार्यालयाकडून मंजूरी मिळते, त्यानंतर कोकण सुरक्षारक्षक मंडळकडून ही सेवा पुरविण्यात येते, त्यामुळे उशीर लागत असल्याचे सांगण्यात आले. मात्र महामंडळच्या दप्तर दिरंगाईत हा प्रस्ताव अडकला नसता तर आज आडाळी औद्योगिक क्षेत्राची आजची बदनमी टळली असती. आता तरी महामंडळ प्रशासनाने त्याची तात्काळ कर्यवाही करून कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमावेत.










