
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य काजू परिषदेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू प्रक्रिया उद्योग, निर्यात केंद्र तसेच मध्यवर्ती सुविधा केंद्र उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ‘काजू फळ पीक विकास योजना’ अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, सिंधुदुर्गसह कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या पाच जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक निर्यात केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र काजू बोर्डाचे तज्ञ संचालक मनीष दळवी यांनी दिली.
या प्रकल्पासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय जागेची मागणी करण्यात आली असून, सुमारे २५ एकर जागा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल MIDC परिसरातील प्रकल्पाच्या धर्तीवर सिंधुदुर्गातही अत्याधुनिक सुविधा असलेले केंद्र उभारले जाणार आहे.
जिल्ह्यातील काजू उत्पादक, प्रक्रिया उद्योग आणि निर्यातदार यांना एकाच छताखाली आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, GI मानांकन प्राप्त काजू उत्पादनांना प्रोत्साहन देणे आणि जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे सिंधुदुर्गातील काजूला स्वतंत्र ब्रँड ओळख मिळण्यास मदत होणार आहे.
काजू प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी AI Technology चा वापर करून २० क्लस्टर तयार करण्याचे नियोजन असून, त्यामधील शेतकऱ्यांना बारामती कृषी विज्ञान केंद्र तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न वेंगुर्ले फळ संशोधन केंद्र यांच्या माध्यमातून मार्गदर्शन व तांत्रिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या प्रकल्पासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून कार्यवाही सुरू असल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले. तसेच ओल्या काजूगराच्या प्रक्रिया उद्योगांनाही या प्रकल्पाशी जोडून शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नांदगाव येथे ‘बाजार आवार’ विकसित करण्यात येत असून, तेथेही काजू सुविधा केंद्र उभारले जाणार आहे. जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या माध्यमातून काजू खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी किमान २० संस्थांना गोदाम उभारणी व खरेदी केंद्रासाठी अनुदान दिले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य काजू परिषदेकडून देण्यात आली.
या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उद्योगाला नवे बळ मिळणार असून, युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.










