तळ्यातील बदकांना वाली कोण ?

कोरड्या तळ्यात मुके जीव सोसतायत चटके !
Edited by: विनायक गांवस
Published on: May 28, 2023 17:04 PM
views 253  views

सावंतवाडी : सुमारे १५० वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक मोती तलावातील गाळ उपसा करण्यासाठी आज तलावातील उरलं सुरल पाणी देखील सोडून देण्यात आले. ऐन उन्हाळ्याच्या सुरूवातीपासून गाळ उपसा करण्यासाठी मुहुर्त शोधणाऱ्या प्रशासनाला अखेर पावसाळ्याच्या तोंडावर मुहूर्त सापडला आहे. नुकताच शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या गाळ उपसा मोहीमेस शुभारंभ करण्यात आला. उशीरानं गाळ उपसा होत असल्यानं व तलाव आटवल्यान शहरातील विहीरींनी तळ गाठल्याने नागरिकांत नाराजी आहे. त्यातच आज पूर्णतः पाणी सोडल्यानंतर या तलावातील बदकांच काय ? त्यांना वाली कोण ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत ही बदक उन्हाचे चटके सोसत आहेत.  


गाळ काढण्याच्या कामाला सुरूवात झाली असून पाणी पूर्णपणे सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत ही मोहीम शिवउद्याना व बांधकाम विभाग समोरील भागात कासव गतीने राबविली जात आहे. मुख्य तलाव परिसरात उरल सुरल पाणी देखील सोडल्यामुळे पाणी असणाऱ्या भागात विहार करणाऱ्या बदकांची अवस्था न बघण्यासाठी झाली आहे.


शहराचे ह्रदय असणाऱ्या मोती तलावात नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यकाळात पहिल्यांदा चार बदकं सोडण्यात आली होती. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला होता. सावंतवाडी तालुका पर्यटन व्यवसायिक महासंघाने याबाबतची मागणी संजू परब यांच्याकडे केली होती. या उपक्रमाच सावंतवाडीकरांकडून कौतुक झालं होतं. पर्यटकांना देखील तलावात मुक्त संचार करणारी बदकं भुरळ घालत होती. दरम्यानच्या काळात भाजपाचे शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम राबवीत तब्बल आठ बदकं स्वखर्चाने तलावात सोडली होती. त्यामुळे एकुण १२ बदकांचा संचार तलावाच सौंदर्य वाढवत होता. कोर्ट परिसर, विसर्जन ठिकाण, आरपीडी परिसर, केशवसुत कट्टा आदी परिसरात ही बदक आपला बस्तान बसवताना दिसून येत होती. परंतु, बदकांच्या या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागलीच. 


वाढता उकाडा व त्यात तलावाती पाणी सोडल्यामुळे खालवलेली पातळी यामुळे ही बदक निदर्शनास येत नव्हती. प्रशासकीय राजवटीत मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडून देखील त्यांची निगा राखली गेली नाही. त्यामुळे उन्हाळ्यात तापलेल्या पाण्यातच या बदकांनी वास्तव्य केलं. आज पाणी पूर्णपणे सोडत गाळ उपसा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतु, या बदकांचा विचार प्रशासनानं केलेला दिसून येत नाही आहे. बदकांसाठी केलेला पिंजऱ्यास देखील कुलुप असून तलावात वाढलेल्या झाडीत ही बदक आश्रय घेत आहेत. त्यांची झालेली अवस्था बघवत नाही आहे. १२ पैकी केवळ ७ बदक पाण्यात दिसून येत आहेत. नवे मुख्याधिकारी सागर साळुंखे हे नुकतेच हजर झाल्यानं कदाचित ह्या बदकांबद्दल त्यांना कल्पना नसेल. मात्र, या प्रकाराबद्दल व प्रशासनाच्या बदकांकडील दुर्लक्षाबद्दल सामाजिक कार्यकर्ते अमित परब यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या बदकांची तातडीनं नगरपरिषदेच्या माध्यमातून सोय करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत कोकणसादनं सावंतवाडी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना कल्पना देत बदकांबद्दल विचारपूस केली असता त्यांच्याकडून या बदकांची उपययोजना करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. गाळ उपसा दरम्यान या बदकांची सोय नगरपरिषद करणार असल्याचं न.प. अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.