सिंधुदुर्गात अधिकाधिक उद्योजक घडावेत

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं मत
Edited by: भरत केसरकर
Published on: February 21, 2023 09:39 AM
views 142  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निसर्गाने भरभरून दिले आहे, पण आपल्या \लोकांची मानसिकता या निसर्ग संपन्नतेच्या माध्यमातून औद्योगिकरणाकडे दिसत नाही. एखादा उद्योग उभा करायचा म्हणजे त्याला नियोजन आणि अंमलबजावणी महत्त्वाची आहे. याकडे सर्व तरुण वर्गाने लक्ष द्याव आणि जास्तीत जास्त या जिल्ह्यात उद्योजक तयार व्हावेत, असा आशावाद केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कुडाळ येथील परीसंवादात व्यक्त केला.  


कुडाळ येथे 'सिंधुदुर्ग विकासाच्या दिशा : माझे चिंतन' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, ॲड. संग्राम देसाई, उपाध्यक्ष अशोक सावंत, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, उपाध्यक्ष रणजीत देसाई, तालुकाध्यक्ष विनायक राणे, दादा साईल, डॉ. मिलिंद कुलकर्णी, शहर अध्यक्ष राकेश कांदे तसेच डॉक्टर, वकील, उद्योजक, प्राध्यापक उपस्थित होते.


या परिसंवादामध्ये सुभाष साबळे, डॉ. प्रशांत मडव, गजानन कांदळगावकर, डॉ.प्रसाद देवधर, बाबा मोंडकर, भूषण नाबर, अशोक सारंग, निलेश सामंत, गौरी मराठे, डॉ. बी. डी. राणे, संजय डिचोलकर, राजन नाईक, राजाराम परब, प्रकाश मोर्ये, संतोष कदम, चंद्रशेखर देसाई, दीपक ठाकूर, चंद्रशेखर पुनाळेकर, आबा केसरकर यांनी मते व्यक्त केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन या संदर्भात अनेकांनी आपली मते व्यक्त केली. यामध्ये गड, किल्ले, ग्रामीण पर्यटन क्रीडा स्पर्धाच्या माध्यमातून होणारे पर्यटन तसेच मासेमारी त्यापासून उत्पादित होणारी उत्पादने, काजू व्यवसाय याबाबत मत व्यक्त करण्यात आली. 


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात निसर्ग संपन्नता आहे. पर्यटनातून व्यवसाय निर्माण होऊ शकतात पण असे व्यवसाय निर्माण करण्यासाठी या ठिकाणच्या नागरिकांची मानसिकता होणे आवश्यक आहे.  पर्यटकांचे स्वागत कसे करावे, त्यांना कोणत्या सुविधा, खाद्यपदार्थ द्यावेत याबाबतही मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. पर्यटक या ठिकाणचे खाद्य घेतील, असे नाही पण त्यांना आवश्यक असणारे खाद्य बनवणारे येथे घडले पाहिजेत. तसेच पर्यटनाबरोबरच उद्योजक बनले पाहिजेत.  प्रदूषण विरहित जे उद्योग आहेत ते या ठिकाणी उभे राहिले पाहिजे. कोणताही व्यवसाय करत असताना त्याचे नियोजन केले पाहिजे. आणि त्यानंतर अंमलबजावणी केली पाहिजे. मात्र आपल्याकडे आधी अंमलबजावणी होते आणि एखादा उद्योग डबघाईला येतो त्यामुळे आधी नियोजन करा, असे सांगून मेहनत घेऊन आपल्या स्वभावामध्ये बदल करून उद्योजक बना आणि जिल्हा, राज्य आणि देशाच्या अर्थकारणामध्ये आपला वाटा उचला, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले.