
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात यावर्षीचा पहिला माकड ताप सदृश्य रुग्ण आढळला आहे. त्यामुळे स्थानिक आणि आरोग्य यंत्रणांमध्ये चिंतेची लाट पसरली आहे. जवळच्या जंगलांमध्ये वाढलेल्या माकडांच्या उपद्रवामुळे हा ताप फैलावाची शक्यता वाढली आहे. मात्र, सर्व ग्रामस्थानी याबाबत जागृत राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. सदृश्य रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
माकड ताप एक गंभीर आजार आहे. माकडापासून होणारा या आजार रानातील गोचीड मुळे मानवाला याचा संसर्ग होतो. गोचीड मानवी शरीरावर चढल्यानंतर ती चावा घेते व त्यातून माकडताप रोगाचे विषाणू शरीरात प्रवेश करतात. शेतकरी यांना या आजाराचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. दोडामार्ग तालुक्यात २०१७ साली माकडतापाचा पहिला रुग्ण दोडामार्ग तालुक्यात आढळला होता. त्यानंतर अनेक रुग्णांना माकड तापाची लागण झाली होती. या आजाराने काहींचा बळी देखील घेतला होता. या आजारावर मात करण्यासाठी व आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाचे शर्थीचे प्रयत्न चालू होते. अखेर या आजारावर प्रतिबंधात्मक लस निर्माण करण्यात आल्यावर आरोग्य विभागाला दिलासा मिळाला. त्यामुळे माकडताप सदृश्य रुग्णांना या आजारापासून वाचविण्यास प्राप्त परिस्थितीत पर्याय निघाल्याने दिलासा मिळाला.
रुग्णाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक सूचना जारी केल्या होत्या. तसेच गावोवागी लसीकरणाचे मोहीम राबवून आजार लागणीपासून सुरक्षा कवच दिले होते. तसेच जनजागृतीसाठी ठिकठिकाणी कॅम्प आयोजित करून माकडताप विषाणू विषयी माहिती लोकांपर्यंत पोहोचविली. या वर्षी दोडामार्ग तालुक्यात पुन्हा नव्याने माकडताप सदृश्य रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. यावेळी, स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.